महापालिका शाळांतील मुले विमानातून ‘इस्रो’ला रवाना
महापालिकेच्या शाळांतील इयत्ता 5 वीमधील 17 विद्यार्थ्यांनी (student) शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. त्या विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (खडठज) अभ्यास दौर्यासाठी महापालिकेने निवड केली.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ही संकल्पना राबविली. सोमवारी सर्व विद्यार्थी विमानाने बंगळूरमधील ‘इस्रो’कडे रवाना झाले. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद लुटला. त्यांच्यासाठी हा अभ्यास दौरा अविस्मरणीय ठरला आहे.
अभ्यास दौर्यासाठीचा 11 लाख रुपये खर्च महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. मुलांना दौर्यासाठी पाठविताना मुलांच्या पालकांनी व नातेवाईकांनी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. कोल्हापूरच्या परिवहन विभागातर्फेे विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी विशेष बस होती. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील चौकातून बसमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजीचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे व अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महापालिकेचे ल. कृ. जरग विद्यालय जरगनगर, नेहरूनगर वसाहत विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांचा (student) दौर्यात समावेश आहे. प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्गदर्शक शिक्षक, महिला डॉक्टर व 17 विद्यार्थ्यांसह बंगळूरकडे रवाना झाले.
यावेळी सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, सचिन पांडव, सूर्यकांत ढाले, अजय गोसावी, संजय शिंदे, राजेंद्र आपुगडे, शांताराम सुतार, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक इत्यादी उपस्थित होते.
जीवनात असेच यशस्वी व्हा : के. मंजुलक्ष्मी
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात असेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांत चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात सखोल अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हा, असेही त्यांनी सांगितले.