मराठ्यांंच्या तलवारी तळपणार शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनात

पोलादी मनगटात तलवार घेऊन मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. तमाम भारतीयांना प्रेरणा देणार्‍या मराठेशाहीच्या तलवारी (Swords) आणि मराठाकालीन शस्त्रे आता प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांच्या साहाय्याने अफजलखानाचा वध केला त्या वाघनखांच्या जोडीने आता शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक स्वर्गीय डॉ. गिरीश जाधव यांच्या संग्रहातील शस्त्रे शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. कोल्हापुरात लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये या प्रदर्शनासाठी विशेष दालन उघडण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी 6 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला ती वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. लोन तत्त्वावर ही वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनामध्ये तमाम शिवभक्तांना ती पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, वाघनखांसह डॉ. गिरीश जाधव यांची मराठाकालीन शस्त्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

डॉ. गिरीश जाधव यांची 1 हजार 550 मराठाकालीन शस्त्रे शासनाने घेतली आहेत. 1 कोटी 74 लाख रुपयांची ही शस्त्रे असून, छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसह यातील 260 ते 265 मराठाकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये शिवशस्त्रशौर्य प्रदर्शन 2 ऑक्टोबर 2025 ते 30 मे 2026 या कालावधीत भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, वातानुकूलीत यंत्रणा, प्रदर्शनामधील कलावस्तूंचे संरक्षण, पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, क्लॉक रूम तसेच इतर कामाच्या आराखड्यासाठी 6 कोटी 67 लाख 36 हजार 113 रुपये इतक्या रकमचे ढोबळ अंदाजपत्रक वास्तुविशारदांकडून तयार करून घेण्यात आले आहे. या ढोबळ अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे.

स्टेट म्युझियममध्ये डॉ. जाधव यांचे शस्त्रदालन होणार

मुंबई येथे नव्याने स्टेट म्युझियम तयार होत आहे. प्रदर्शनानंतर या म्युझियममध्ये डॉ. गिरीश जाधव यांच्या शस्त्रांची गॅलरी तयार करण्यात आली आहे.

वाघनखांसह मराठा कालखंडातील शस्त्रे पाहता येणार

शिवशस्त्रशौर्य प्रदर्शनामध्ये वाघनखांसह डॉ. गिरीश जाधव यांच्या संग्रहालयातील मराठाकालीन तलवारीचे (Swords) सर्व प्रकार, गुर्ज, ढाल, बाण, भाले, पट्टे, कट्यार, विळ्याचे, कुर्‍हाडींचे प्रकार पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *