‘बिग बॉस’मध्ये सतत सुशांतचा उल्लेख का केला? अंकिताने सांगितलं खरं कारण
(entertenment news) अभिनेत्री अंकिता लोखंडेचा ‘बिग बॉस 17’मधील प्रवास अनेक आव्हानांनी आणि अडथळ्यांनी भरलेला होता. असं असूनही तिने टॉप 4 स्पर्धकांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. बिग बॉसच्या घरात अंकिताने अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला होता. त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. अंकिताने सहानुभूती मिळवण्यासाठी सुशांतच्या नावाचा वापर केला असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला. इतकंच नव्हे तिच्या सासूनेही यावरून सुनावलं होतं. प्रेक्षकांची आणि इतर स्पर्धकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अंकिता घरात सतत सुशांत सिंह राजूपतचं नाव घेते, असं विकी जैनची आई रंजना जैन म्हणाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने यावर मौन सोडलं आहे. सुशांतबद्दल बोलण्यासाठी मला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही आणि मी कोणालाही त्याबद्दल उत्तर देण्यास बांधिल नाही, असं तिने म्हटलंय.
“मला कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही”
मुलाखतीत अंकिता म्हणाली, “होय, मी त्याबद्दल वाचलंय आणि मला हेच सांगायचं आहे की मला कोणाच्याही फॅन फॉलोईंगची गरज नाही. मला कोणाबद्दल बोलण्यासाठी कोणाकडूनही परवानगी घ्यायची गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात खरंच काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, तर मी नक्कीच त्यावर चर्चा करेन. मी बिग बॉसच्या घरात माझ्या वडिलांबद्दलही खूप बोलायचे. कारण ते माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होते.” (entertenment news)
“मी लोकांना उत्तर देण्यास बांधिल नाही”
“होय, मी सुशांतबद्दल बोलायचे, कारण जर माझ्यासमोर एखादा मुलगा बसला असेल आणि त्याच्यासाठी सुशांत प्रेरणास्थान असेल आणि मला सुशांतविषयी काही माहिती असेल तर त्याबद्दल मी त्यांच्यासोबत का बोलू नये? सुशांतबद्दलच्या चांगल्या गोष्टी मी त्यांना का सांगू नये? मी नक्कीच त्या व्यक्तीला प्रोत्साहित करेन. जर एखादी व्यक्ती या जगात नसेल आणि त्या व्यक्तीने आयुष्यात काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याबद्दल चर्चा करण्यात मला कोणतीच समस्या नाही. माझ्या पतीलाही कोणती समस्या नाही. त्यामुळे मी लोकांना उत्तर देण्यास बांधिल नाही”, अशी सडेतोड प्रतिक्रिया तिने दिली.
बिग बॉसमध्ये काय शिकायला मिळालं?
बिग बॉसच्या घरात राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असंही अंकिताने या मुलाखतीत सांगितलं. “माझ्या प्रवासातून मी हेच शिकले की तुम्ही कधीच अती भावूक किंवा अती व्यक्त होऊ नये. या दोन गोष्टी तुम्ही कधी कधी टाळायला हव्यात. तुमच्या भावनांवर आणि प्रतिक्रियांवर तुमचं नियंत्रण असायला हवं. बिग बॉसचं घर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतं”, असं ती पुढे म्हणाली.