सीपीआरमध्ये सुरू होणार ‘एटीएफ’ सेंटर
सीपीआरमध्ये ‘एटीएफ’ (अॅडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी) सेंटर सुरू होणार आहे. केंद्र शासनाच्या (Central Govt) सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ राज्यातील चौथे आणि देशातील 41 वे हे केंद्र कोल्हापुरात कार्यरत होणार आहे.
देशभरात अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून ‘ड्रग्ज अॅडिक्टेट’ लोकांचे प्रमाणही वाढत आहे. दिवसेंदिवस त्यातून निर्माण होणार्या समस्या चिंताजनक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची मागणी कमी व्हावी, याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय कृती योजना (एनएपीडीडीआर) आखली आहे. त्यांतर्गत व्यसनाधीन रुग्णांचे समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसन याकरिता देशभरात व्यसनाधीन रुग्णांना उपचाराच्या अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सीपीआर रुग्णालयात सध्या अशा रुग्णांवर उपचार केले
जातात. मात्र, नव्याने स्थापन होणार्या या सेंटरसाठी एक वैद्यकीय अधिकारी, दोन समुपदेशक, पाच नर्सिंग स्टाफ आणि एक माहिती व्यवस्थापक, असे 9 अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. याखेरीज उपचारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, औषध खरेदीसाठी निधी मिळणार आहे. यामुळे अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी हे केंद्र (Central Govt) महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यात मुंबई, पुणे आणि धुळे या तीन जिल्ह्यांत यापूर्वी केंद्र शासनाने या केंद्रांची स्थापना केली आहे. देशातही आतापर्यंत अशी 40 केंद्रे सुरू झाली असून, आता राज्यातील चौथे आणि देशातील 41 वे केंद्र सीपीआरच्या मानसोपचार विभागात सुरू होणार आहे. या केंद्रासाठी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसाहाय्य केले जाणार असल्याचे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले.