पावनगडावरील नागरिकांत भीतीचे वातावरण
पन्हाळगडावरून पावनगड रस्त्यावरील मार्तंड परिसरात रस्त्याकडेच्या झुडपात बिबट्याचे (leopard) दर्शन झाले. कामावरून पावनगड येथे घरी परतत असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नजीर मुजावर, समीर मुजावर, साहिल मुजावर यांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याच्या दर्शनाने कामावरून घरी परतणार्या पावनगडावरील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याच्या (leopard) हल्ल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मनुष्य-बिबट्या संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी वन विभागाच्या अधिकार्यांनी त्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांमधून होऊ लागली आहे. मात्र, वन अधिकार्यांनी या भागामध्ये फार पूर्वीपासून बिबट्याचा अधिवास असल्याने व हा बिबट्या त्याच्याच अधिवासात असल्याने जरी कोणाला बिबट्या दिसलाच तर लोकांनी घाबरून जाऊ नये व त्याला त्रास होईल असे वर्तन करू नये, असे म्हटले आहे.