कोल्हापूरात राजेश क्षीरसागर यांच्या घराजवळ तणाव

माजी आ. राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा आरोप करणार्‍या वरपे कुटुंबीयांना भेटण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे येणार असल्याचे समजताच गुरुवारी क्षीरसागर यांच्या घरासमोर समर्थकांनी गर्दी केल्याने प्रचंड तणाव (stress) निर्माण झाला. क्षीरसागर व वरपे एकाच अपार्टमेंटमध्ये राहात असून दानवे यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक येतील या शक्यतेने क्षीरसागर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले. दरम्यान, क्षीरसागर समर्थकांनी दानवे यांच्या समवेत ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांना जाण्यास अटकाव केल्याने किरकोळ धक्काबुक्की झाली.

इमारतीत प्रवेश करू पाहणार्‍या ठाकरे गटाच्या विजय देवणे यांना पोलिसांनी बाहेर काढले. दानवे यांच्या भेटीनंतर चार ते पाच तासांनी हा हाय व्होल्टेज ड्रामा संपुष्टात आला.

शनिवार पेठेतील श्री शिवगंगा संकुल अपार्टमेंटमध्ये राजेश क्षीरसागर व राजेंद्र वरपे हे दोघे कुटुंबीयांसह राहतात. दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याने पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी वरपे यांच्या बाजूने भूमिका घेतली. तेव्हापासून हा वाद अधिकच चिघळला.

गुरुवारी अंबादास दानवे हे वरपे कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याचे समजताच क्षीरसागर समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर गर्दी करण्यास सुरुवात केली. यात महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे व गळ्यात भगवे स्कार्फ होते. ‘चले जाव, चले जाव, दानवे चले जाव, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यास सुरुवात झाल्याने तणाव वाढला. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी क्षीरसागर यांच्या निवासस्थासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला.

चारच्या सुमारास पोलिस प्रशासनाने युवा सेनेचे सचिव ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, शहर अध्यक्ष रणजित जाधव यांच्याशी चर्चा केली. आमचा दानवे यांच्या भेटीला विरोध नाही, त्यांच्यासोबत येणार्‍या स्थानिक पदाधिकार्‍यांना आमचा विरोध असल्याने त्यांना आम्ही प्रवेश देणार नाही, असे क्षीरसागर, चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना इमारतीत सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांना दिली.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दानवे आले. त्यांच्या सोबत ठाकरे गटाचे विजय देवणे होते. त्यांना पाहून क्षीरसागर समर्थक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. एका कार्यकर्त्याने झेंड्यासह काठी पोलिसांच्या दिशेने भिरकावली. तर देवणे यांच्या दिशेने सुनील जाधव व अन्य कार्यकर्ते धावून गेले. त्यांना पोलिसांनी अडविले. या घटनेने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. यामुळे पोलिसांनी देवणे यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर तणाव (stress) निवळला. दानवे यांच्यासोबत अरुण दुधवडकरही उपस्थित होते.

चार ते पाच तास कार्यकर्त्यांचा ठिय्या

राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी सुमारे चार ते पाच तास ठिय्या मारला होता. ठाकरे गटाचे पदाधिकारी आले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *