लोकसभा आचारसंहितेपूर्वी शेतकर्‍यांना 50 हजार अनुदान

राज्यातील 70 हजारहून अधिक शेतकर्‍यांनी (farmer) प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली असून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. याबाबत सातत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ. राजेश पाटील यांनी मागणी केली असून लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या शेतकर्‍यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

नूल (ता. गडहिंग्लज) येथे सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आजवर महाराष्ट्राला पुरोगामित्व व वेगळा विचार दिला असून नूलच्या या मठाच्या सांस्कृतिक भवनामुळे समाजाला वेगळी दिशा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय कोणीही नेता देशाला जगामध्ये पुढे नेऊ शकणार नसल्याने त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही कंबर कसली असून त्याला साथ द्या.

गडहिंग्लजच्या पूर्व भागातील पाणीप्रश्नांसाठी मी नक्की लक्ष घालणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आताच दिल्या आहेत. केवळ पोकळ आश्वासने देणारे आम्ही नसून वचनपूर्ती हेच आमचे काम आहे. घड्याळ जुनेच आहे फक्त वेळ नवी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खा. संजय मंडलिक म्हणाले, चांगल्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे वैभव आहे. पूर्व भागातील पाण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सेंद्रिय शेतीसाठी सुरगीश्वर मठ प्रयत्न करणार असून त्याला शासनाचे पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. याशिवाय बसवेश्वर महामंडळाला किमान 1000 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले अन् पहिल्यांदाच गडहिंग्लजला आले. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वामीजींनी आमच्या सरकारला आशीर्वाद द्यावेत. जेणेकरून सांस्कृतिक भवनासाठी 4 कोटी आम्हाला तत्काळ आणता येतील. गडहिंग्लज शहरातील मठाच्या जागेवर उत्कृष्ट परीक्षा केंद्र उभे करू. गडहिंग्लजच्या पूर्व भागातील पाणी प्रश्नांसाठी सीमाभागामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी निधी देण्याची मागणीही त्यांनी ना. पवार यांच्याकडे केली.

यावेळी गुरूसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आशीर्वचन केले. आ. राजेश पाटील म्हणाले, 2019 साली ना. पवार व ना. मुश्रीफ यांनी विश्वास ठेवून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. गेल्या 40 वर्षांत जितका विकास झाला नाही तितका विकास गेल्या चार वर्षांत करून दाखवला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात कृषी विद्यापीठ, मोठा उद्योग आणण्यासाठी सहकार्य करावे. आगामी काळात ना. पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे.

स्वागत राजेश पाटील-औरनाळकर यांनी केले. प्रास्ताविकातून जयसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी चंदगड मतदारसंघाला 850 कोटींचा निधी दिल्याबद्दल ना. पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अन्य मान्यवरांचाही सत्कार झाला.

दरम्यान ना. पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते चांदीचे टिकाव व फावडे वापरून सुरगीश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रियांका यादव यांनी स्वागत केले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, सुरगीश्वर मठाचे भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार संजय थोरात यांनी मानले.

कायदा सर्वांसाठी सारखा…

सलग झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर उपमुख्यमंत्री पवार यांनी, महाराष्ट्रामध्ये कायदा सर्वांसाठी सारखाच असून कोणी कितीही मोठा असला तरी चुकीच्या कृत्याला पाठीशी घातले जाणार नाही. संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याप्रमाणे कारवाई नक्कीच होईल, असे मत व्यक्त केले.

चंदगडला द़ृष्ट लावू नका…

चंदगड विधानसभा मतदारसंघात स्व. बाबासाहेब कुपेकरांपासून माजी आ. संध्यादेवी कुपेकर व आता आ. राजेश पाटील यांनी सर्वोत्तम काम केले असून राष्ट्रवादीची फार मोठी ताकद याठिकाणी आहे. चंदगडला चांगले काम चालू असून याला कोणाची द़ृष्ट लागू देऊ नका, असा सल्लाही ना. पवार यांनी यावेळी दिला.

शेतकरी समाधानी तर…

मी शेतकर्‍याचा मुलगा (farmer) असून मला शेतकर्‍यांचे दुःख चांगलेच माहिती आहे. पाणीपट्टी अचानक वाढवल्याने मला आश्चर्यच वाटले म्हणून मी पाणीपट्टी वाढ तातडीने कमी करावयास लावली. शेतकरी समाधानी तरच सर्वजण समाधानी राहात असल्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत असल्याचे ना. पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *