शरद पवार यांची काॅंग्रेसला सूचना; “राज्यसभेसाठी शाहू महाराजांना….”
कोल्हापूरचे शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी (Candidacy) दिली जावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कोट्यातील विजयाची खात्री असलेल्या एकमेव जागेसाठी शाहू महाराज यांच्या नावाचा विचार प्राधान्याने केला जाऊ शकतो, असे संकेत प्राप्त झाले आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली तेव्हा त्यांनी ही सूचना केल्याचे समजते.
महाविकास आघाडीतर्फे सुरूवातीला माजी खा. संभाजीराजे यांना लोकसभेसाठी उमेदवारी (Candidacy) देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र ते स्वतःच्या स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी लढण्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ‘मविआ’तर्फे शाहू महाराज यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांची काही दिवसांपूर्वी भेटही घेतली होती. त्यानंतर त्यांनी शाहू महाराजांना राज्यसभेवर पाठविण्याची सूचना केली. राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांचा विचार करायला हवा. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून 30 मते वेगळी आहेत. इतरही येतील, असे संजय राऊत यांनी आपल्या 3 फेब्रवारीच्या ट्विटमध्ये म्हटले होते.
महायुतीतर्फे राज्यसभेच्या सहाही जागा जिंकण्याचे व त्यासाठी काँग्रेसची मते फोडण्याची गणिते मांडली जात आहेत. राष्ट्रवादीबाबत 15 तारखेला राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर अजित पवार गटाचा व्हीप शरद पवार गटाला लागू होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला लागू होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण होणार आहे.