आचारसंहिता भंग तक्रारीवर शंभर मिनिटांत होणार कारवाई
आचारसंहिता (code of conduct) भंगाच्या तक्रारी ‘सी व्हिजील’ अॅपवर कोणालाही करता येणार आहेत. या अॅपवर दाखल झालेल्या तक्रारींवर पुढील शंभर मिनिटांत कारवाई होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक (election) अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत होणार्या पैशांच्या गैरवापराबरोबर ड्रग्ज वापरावर विशेष लक्ष राहणार आहे, तशा यंत्रणेला सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. देशपांडे जिल्हानिहाय पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ होणार आहे. यामुळे या मतदान केंद्रांवर काय चालले आहे, हे जिल्हा, राज्य आणि मुख्य निवडणूक आयुक्त स्तरावरही पाहता येणार आहे.
उमेदवारांची माहिती ‘केवायसी’ अॅपवर मिळणार
निवडणुकीतील उमेदवारांची संपत्ती किती, गुन्हे किती आदी सर्व माहिती ‘केवायसी’ अॅपवर प्रत्येकाला पाहता येणार आहे. याखेरीज मतदान केंद्रांत उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेविषयक माहिती मांडता येईल, याद़ृष्टीने विचार सुरू आहे. यामुळे उमेदवारांची माहिती घेऊन मतदारांना मतदान करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचाही सहभाग
मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांवर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करता येणार आहे. तसेच निवडणुकीपूर्वी (election) मतदारांसाठी विद्यार्थ्यांच्या गृहभेटी आयोजित केल्या जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना आयोगाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मतदान प्रक्रिया समजून घेता यावी, याकरिता हा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
80 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांगांसाठी घरीच मतदान
80 वर्षांवरील सर्व मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना घरीच मतदान करता येणार आहे. याकरिता आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील पाच दिवस या प्रत्येक मतदारांच्या घरी 12-डी हा अर्ज पाठवला जाईल. त्यामध्ये मतदान घरी करणार की, मतदान केंद्रांवर याचा पर्याय द्यावा लागणार आहे. दिव्यांगांकडे प्रमाणपत्र नसेल आणि प्रथमदर्शनी त्याचे अपंगत्व 40 टक्क्यांपेक्षा अधिक वाटत असेल, तर संबंधितांचे जिल्हा शल्यचिकित्सकाकडून प्रमाणपत्र काढून घेतले जाणार आहे.
ड्रग्ज वापरावर विशेष लक्ष ठेवणार
निवडणुकीतील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 22 यंत्रणांकडून काम केले जात आहे. याकरिता संगणक प्रणालीही विकसित केली आहे. त्यात बँकांचाही समावेश आहे. यामुळे निवडणूक काळात संबंधित बँकांच्या होणार्या कॅश हस्तांतरण, वाहतुकीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. मद्यासह ड्रग्ज वापरावरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तशा सूचना अमलीपदार्थ विरोधी विभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.