जिल्हास्तरावर विणणार ड्रोनचे जाळे
राज्यात जिल्हा स्तरावर ड्रोनचे जाळे (network of drones) विणले जाणार आहे. महाराष्ट्र ड्रोन हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ड्रोन मिशन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पांतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यांत जिल्हास्तरीय व सहा विभागीय ठिकाणी ड्रोन केंद्रे उभारली जाणार आहेत.
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक क्रांतिकारक बदल घडत आहेत. विविध जटिल व गुंतागुंतीच्या आव्हानात्मक समस्या सोडविण्यासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होत असल्याने ‘महाराष्ट्र ड्रोन हब’ विकसित करण्याचा निर्णय जून 2023 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार आयआयटीने ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ प्रकल्प सादर केला होता. हा प्रकल्प राज्य सरकारने स्वीकारला आहे.
शैक्षणिक, संशोधन संस्था, औद्योगिक आस्थापनेकडून निर्मिती
राज्यातील अभियांत्रिकी शैक्षणिक व संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा, औद्योगिक आस्थापना यांच्या सहभागाने ड्रोन (network of drones) तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे विविध विभागस्तरीय व जिल्हास्तरीय ड्रोन केंद्रांचे जाळे उभारले जाणार आहे. या ड्रोन केंद्रांचे मुख्यालय आयआयटी मुंबईमध्ये स्थापन केले जाणार आहे.