एक महिन्यापूर्वी कुत्रा चावला; रेबीजची लस देऊनही मृत्यूने गाठले
महापालिकेजवळच मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात महावीर कॉलेजजवळील विशाळगडकर कंपाऊंड येथील सृष्टी सुनील शिंदे (वय 21) या तरुणीचा रविवारी मध्यरात्री रेबीजमुळे मृत्यू (death) झाला. महिनाभरापूर्वी भाऊसिंगजी रोडवर मोकाट कुत्र्याने सृष्टीवर हल्ला केला होता. अधिकार्यांच्या बेफिकिरीमुळे एका सामान्य कुटुंबातील निष्पाप तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
रेबीज संशयित भटक्या कुत्र्याने 3 फेब्रुवारी रोजी सृष्टीच्या डाव्या पायाचा लचका तोडला होता. गंभीर जखमी झाल्याने तिने सीपीआर येथे प्राथमिक उपचार घेतले होते. जखम खोलवर असल्याने पायाला टाके घालून तिला डिस्चार्ज केले होते. मात्र, दरम्यान पुढील उपचार ती घेत होती. रेबीज प्रतिबंधक लसीचे तिचे तीन डोस पूर्ण झाले होते. मात्र, जखम चिघळली होती.
शनिवारी मध्यरात्री अचानक सृष्टीला ताप आला. यानंतर दोन्ही पायांतील ताकद गेली. नातेवाईकांनी फॅमिली डॉक्टरकडे प्राथमिक तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे एका नामांकित रुग्णालयात तिला दाखल केले. प्राथमिक तपासणीत सृष्टीला ‘जेबी सिंड्रोम’ झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; पण प्रकृती साथ देत नव्हती. रविवारी पहाटे तिच्या ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. दरम्यान, डॉक्टरांनी तिच्या आणखी वैद्यकीय तपासण्या केल्या. यामध्ये तिला रेबीज झाल्याने निष्पन्न झाले.
नातेवाईकांनी रविवारी रात्री 11 वाजता सृष्टीला खासगी रुग्णालयातून सीपीआर येथे हलविले. रेबीजचा संसर्ग शरीरात भिनल्याने प्रकृती पूर्णतः खालावली होती. रविवारी मध्यरात्री तिचा रेबीजने मृत्यू (death) झाल्याचे सीपीआरने स्पष्ट केले. तिच्या मागे वडील, आई, बहीण असा परिवार आहे.
टाकाळा चौक ते भाऊसिंगजी रोडवर ‘त्याची’ दहशत
महापालिकेच्या परिसरातच मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरू असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. रेबीज संशयित कुत्र्याने टाकाळा चौक ते भाऊसिंगजी रोडवर दहशत माजवत सुमारे 30 हून अधिक नागरिकांचा चावा घेतला आहे. यामधील काही जणांनी रेबीज प्रतिबंधक लस घेतली आहे; तर अजूनही अनेकांनी लस घेतलेली नाही. ज्या लोकांनी रेबीज प्रतिबंधक उपचारांसाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कुत्रा चावताच काय करावे?
कुत्रा किंवा प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर जखम झालेली जागा स्वच्छ करणे अतिशय महत्त्वाचे असते. पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटे स्वच्छ धुवावा. तत्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. लसीच्या वेळापत्राचे तंतोतंत पालन करावे.