कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर विमानतळाच्या (airport) नव्या टर्मिनल इमारतीचे रविवारी (दि. 10) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील विमानतळांच्या विस्तारीकरणासाठी आणि विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातून कोल्हापूर विमानतळावर विविध सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत.
या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या माध्यमातून यासाठी भरीव निधी आणला. त्यातून ही इमारत उभारली गेल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर कोल्हापूरकरांना विमानतळावर नव्या आधुनिक आणि ऐतिहासिक लूक असलेली देखणी इमारत मिळणार आहे.
कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळांवर (airport) अलिगड, चित्रकूट, आजमगड, मुराबाद आणि आदमपूर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. वाराणसी, कडाप्पा, हुबळी आणि बेळगाव येथे नवीन टर्मिनल भवनसाठी निधी मंजूर झाला आहे. दिल्ली विमानतळावर टर्मिनल भवनसाठी 4 हजार 600 कोटी आणि लखनौ विमानतळासाठी 2,400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन आणि नव्या कामांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उपस्थित राहण्याबाबत खा. महाडिक यांना केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज विशेष पत्र पाठवले आहे. यावेळी लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.