कोल्हापूर-परिते मार्ग अजून किती लोकांचे बळी घेणार?
कोल्हापूर-परिते मार्गावर गतिरोधक (deadlock), धोकादायक चिन्हांचे फलक, रिप्लेटर नसल्यामुळे वाहनधारक वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे येथे सतत अपघात होऊन हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. कोल्हापूर-परिते मार्गावर अजून किती वाहनधारकांचा बळी घेणार आहात, असा संतप्त सवाल या मार्गावरील वाहनधारक, नागरिक सार्वजनिक बांधकाम खात्याला करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यामुळे वेळकाढूपणामुळे या मार्गाच्या कामांना ग्रहण लागले आहे. अधिकारी, ठेकेदाराने कोल्हापूर-परिते मार्गावरील प्रश्नाबाबत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पण तसे होत नसल्यामुळे निगरगट्ट अधिकारी, ठेकेदाराचे डोळे उघडणार कधी? असा सवाल करत वाहनधारकांत संतापाची लाट पसरली आहे.
फलक अत्यंत गरजचे आहेत. हे प्रश्न वारंवार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून देऊनदेखील याकडे अधिकारी, ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता येत्या चार-पाच दिवसांत हे काम आम्ही चालू करतोय असे केवळ आश्वासन दिले जाते. आश्वासनाच्या भूलथापा मारून गेली कित्येक महिने खात्याने हा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. यामुळे भोंगळ, निष्काळजीपणाचा कारभार या खात्यात चालू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
येत्या दोन दिवसांत गतिरोधक (deadlock), धोकादायक चिन्हांचे फलक, रिफ्लेटरचे काम न केल्यास या मार्गावरील वाहनधारक, गावांतील नागरिकांतून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात तीव्र लढा उभा करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संबंधित घटकांच्या वतीने देण्यात आला आहे.