पेटीएम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी
जानेवारीच्या अखेरीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून आणि फास्टॅगपासून वॉलेटमध्ये नवीन ठेवी जोडण्यापासून बंदी घातली होती. या निर्बंधांपूर्वी लोकांना २९ फेब्रुवारीपर्यंत सूट मुदत देण्यात आली होतो जी नंतर १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. आता या प्रकरणी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेटीएम वॉलेट ग्राहकांना (customers) मोठा दिलासा दिला आहे.
पेटीएम वॉलेटच्या ग्राहकांना दिलासा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी सांगितले की, पेटीएम वॉलेट वापरणाऱ्या ८० ते ८५ टक्के वापरकर्त्यांना नियामक कारवाईमुळे कोणत्याही व्यत्ययाचा सामना करावा लागणार नाही. तर उर्वरित वापरकर्त्यांना म्हणजे १५ टक्के ग्राहकांना त्यांचे वॉलेट इतर बँकांशी लिंक करण्याचा सल्ला दिला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (PPBL) कोणत्याही ग्राहकाच्या (customers) खात्यावर ठेवी स्वीकारण्यास किंवा ‘टॉप-अप’ करण्यापासून प्रतिबंधित केले होते.
दास म्हणाले की पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडलेले वॉलेट इतर बँकांशी जोडण्याची अंतिम मुदत १५ मार्च आहे आणि आणखी मुदत वाढवून देण्याची शक्यता आरबीआय गव्हर्नरांनी फेटाळून लावली. १५ मार्चपर्यंत दिलेली मुदत पुरेशी असून ती वाढवण्याची गरज नसल्याचे आरबीआय गव्हर्नर म्हणाले. पेटीएम पेमेंट्सच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे तीन कोटी वॉलेट नोंदणीकृत आहेत.
फिनटेकला पूर्ण समर्थन
एका वृत्तवाहिनीशी संभाषणादरम्यान, ‘‘आरबीआय फिनटेक (आर्थिक तंत्रज्ञान कंपन्यांना) पूर्णपणे समर्थन देते आणि ते करत राहील… फिनटेकच्या विकासासाठी आरबीआय पूर्णपणे तयार आहे.’’ दास म्हणाले की पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई नियमनाच्या कक्षेत तपासणीचा भाग म्हणून करण्यात आल्याचेही दास यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की हे एक वैयक्तिक प्रकरण आहे, ज्याचा इतर फिनटेक कंपन्यांशी काहीही संबंध नाही. त्यांनी म्हटले की, याउलट आरबीआय वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेचे समर्थन करते आणि नवीन उत्पादनांच्या चाचणीसाठी ‘सँडबॉक्स’ (मर्यादित व्याप्तीमध्ये उत्पादनांची ‘लाइव्ह’ चाचणी) प्रणाली आणली आहे.
उदाहरण देत दास म्हणाले की कोणती एखादी व्यक्ती फेरारी चालवू शकते आणि चालवू शकते, परंतु तरीही अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे लागेल. पेटीएम पेमेंट ॲप परवान्याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कधी निर्णय घेईल, असे विचारले असताना दास म्हणाले की, या अंतर्गत तपासणीनंतरच या संदर्भात पाऊल उचलावे लागेल.
दास म्हणाले की, “आरबीआयच्या बाबतीत बोलायचे तर आम्ही त्यांना कळवले आहे की NPCI ने पेटीएम पेमेंट ॲप चालू ठेवण्याचा विचार केला तर आमची हरकत नाही कारण आमची कारवाई पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध होती. ॲप NPCI कडे आहे… NPCI यावर विचार करेल… मला वाटते त्यांनी यावर लवकरच निर्णय घ्यावा.’’