पेटीएमच्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कारवाईनंतर पेटीएमची सेवा सुरू राहील की बंद होईल या चिंतेत असलेलया ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. पेटीएमची सेवा सुरूच राहणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना (customers) होणारी गैरसोय टाळता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडला UPI मध्ये मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजे यापुढे आता वापरकर्ते आणि व्यापारी कोणत्याही व्यत्ययाशिवाय UPI व्यवहार करू शकतील.

या निर्णयामुळे पेटीएमच्या करोडो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून यूपीआय पेमेंट सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील कारण आरबीआयच्या निर्बंधांचा परिणाम केवळ पेटीएम पेमेंट्स बँकेवर होईल आणि पेटीएमवर नाही.

पेटीएमच्या ग्राहकांना दिलासा

एनपीसीआयने गुरुवारी एक निवेदन जारी केले ज्यानुसार पेटीएमला मल्टी बँक मॉडलनुसार यूपीआय पेमेंटचे थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरचे लायसन्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार पेटीएम प्लॅटफॉर्मवरून आता ग्राहक (customers) गुगल पे, फोनपे, भारत पे ॲपसारख्या यूपीआय सर्व्हिसचा वापर करू शकतील.

पेटीएमचा चार मोठ्या बँकांसाठी करार

ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), येस बँक या चार बँकांशी पेटीएमने टायअप केला असून या बँका OCL साठी PSP (पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर) बँका म्हणून काम करतील. येस बँक विद्यमान आणि नवीन UPI व्यापाऱ्यांसाठी OCL साठी व्यापारी संपादन बँक म्हणून काम करेल. “@Paytm” हँडल येस बँकेकडे रीडायरेक्ट केले जाईल, जे विद्यमान पेटीएम वापरकर्ते आणि व्यापाऱ्यांना पेटीएम वरून यूपीआय व्यवहार आणि ऑटोपे करण्याची परवानगी देईल. पण यासाठी विद्यमान हँडल नवीन पीएसपी बँकांकडे हस्तांतरित केले जाईल.

पेटीएमसाठी किती महत्त्वाचा निर्णय

गेल्या महिन्यात आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती ज्याअंतर्गत पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंट्स बँकेशी जोडल्या गेल्या असतील तर त्या १५ मार्चनंतर सुरू राहणार नाहीत. तर यूपीआय सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल, असे केंद्रीय बँकेने म्हटले होते. त्यानंतर आता पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन लिमिटेडने यासाठी चार बँकांशी करार केला आहे.

यापूर्वी आरबीआयने एनपीसीआयला पेटीएमची यूपीआय सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले होते. NPCI ला आदेश जारी करताना आरबीआयने म्हटले होते की पेटीएम ॲपद्वारे सेवा सुरू ठेवण्यासाठी NPCI ने पेमेंट सेवा प्रदाते म्हणून उच्च व्हॉल्यूम यूपीआय व्यवहार हाताळण्याची क्षमता असलेल्या बँकांचे प्रमाणीकरण करण्याची सुविधा प्रदान करावी. अशा प्रकारे, आता एनपीसीआयने पेटीएमला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून मान्यता दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *