एकट्याचेच अभ्यंगस्नान झाले; ‘थेट पाईपलाईन’मध्ये लक्ष घालणार : धनंजय महाडिक

थेट पाईपलाईनच्या पाण्याने एकट्यानेच अभ्यंगस्नान केले. आता पाच महिने झाले तरी शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही, त्याचे काय, असा सवाल करत आता ‘थेट पाईपलाईन’मध्ये लक्ष घालणार, असे खासदार (member of parliament) धनंजय महाडिक यांनी सांगितले. श्रेयवादासाठी नाही, तर लोकांना पाणी मिळावे यासाठी आपण लक्ष घालत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विमानतळ टर्मिनल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आजी-माजी पालकमंत्र्यांचा उल्लेख झाला. विमानतळ विकासावरून श्रेयवादही सुरू आहे, याबाबत विचारता खा. महाडिक म्हणाले, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांना घेऊ द्या; मात्र बंद पडलेला हा विमानतळ सुरू करून या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी काय प्रयत्न केले, ते सर्वांनाच माहीत आहे. विमानतळ सुरू करण्यासाठी डीजीसीएच्या कार्यालयात किती फेर्‍या मारल्या, स्वखर्चाने फाईल तयार केली. उडान योजनेतून सेवा द्यायला कोणी तयार नव्हते, त्यावेळी पहिल्या कंपनीला सहा महिन्यांचे अ‍ॅडव्हान्स पैसे देण्याची ग्वाही देऊन विमानसेवा सुरू केली.

वीस वर्षे विमानतळ बंद होते. त्यावेळी काहीजण तर सत्तेत मंत्री होते. या आठवड्यात करतो, त्या आठवड्यात करतो, असे काहीजण म्हणत होते. मंत्री असतानाही त्यांच्याकडून ते का झाले नाही, असा टोला नाव न घेता सतेज पाटील यांना लगावत खा. (member of parliament) महाडिक म्हणाले, यांचे विमान हवेत घिरट्या घालत आहे. बास्केट बि—ज कुठे आहे, अशी टीका करत होते. आज विमान खरोखर कोल्हापूरवर घिरट्या घालत आहे. बास्केट बि—जचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

थेट पाईपलाईनचे पाणी संपूर्ण शहरात अजून पोहोचलेले नाही. अजूनही महिला पाण्यासाठी फिरत आहेत. पाणी कधी मिळणार, हे अजूनही स्पष्ट नाही. यामुळे आता आपण लक्ष घालणार आहे. महापालिका अधिकार्‍यांना भेटून, पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीबाबत वरिष्ठांनी कोणतीही चर्चा केली नाही. कोणताही संदेश दिलेला नाही. लोकसभेसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ भाजपला मिळणार, काही उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, हे सर्व आपण चर्चेतूनच ऐकत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *