कोल्हापूरच्या विमानतळाचा आणि विमानसेवेचाही विस्तार लवकरच

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी (runway) विस्तारीकरणासाठी उर्वरित भूसंपादन लवकरच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन टर्मिनलच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी इमारतीची पाहणी केली. दीपप्रज्वलन करून त्यांनी इमारतीतील विविध दालनांचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, या इमारतीला दिलेल्या ऐतिहासिक लूकमुळे ही इमारत ‘ऑयकॉन’ बनली आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा आणि विमानसेवेचाही विस्तार केला जाईल. त्याद़ृष्टीने राज्य शासनाकडून योग्य ते प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल.

धावपट्टी (runway) विस्तारीकरणासाठी जी जमीन आवश्यक आहे, त्याच्या भूसंपादनाच्या अडचणी दूर केल्या जातील. त्याकरिता संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल आणि प्रत्यक्ष संपादन होईल, असेही शिंदे यांनी सांगितले. अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री गेल्यानंतर विमानतळ टर्मिनल इमारत सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी काही काळ खुली करण्यात आली होती. यावेळी मोठी गर्दी झाली होती.

पंतप्रधानांच्या भाषणामुळे शिंदे थांबले

विमानतळ टर्मिनल लोकार्पण कार्यक्रमासाठी शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. सकाळी पावणेअकरा वाजता ते पोहोचणार होते; मात्र ते पावणेबारा वाजता पोहोचले. व्यासपीठावर आल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी आपले भाषण थांबवत, त्यांना बोलण्याची विनंती केली. शिंदे यांनी भाषण सुरू करताच पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू झाल्याने शिंदे यांनी भाषण थांबवले. विमानतळ टर्मिनल पाहणीनंतर त्यांनी संवाद साधला. दुपारी 1.15 वाजता ते नांदेडला रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *