साेन्यातल्या गुंतवणुकीवेळी ‘ही’ घ्या काळजी; तरच मिळेल चांगला परतावा
भविष्य काळासाठी गुंतवणूक (investment) करणं ही तशी सोपी वाटणारी गोष्ट. पण, ज्याला ‘गुड रिटर्न्स’ असं म्हणतात तशी ‘चांगला परतावा’ देणारी गुंतवणूक विचारपूर्वक करायला लागते.
बर्याचदा असं दिसतं की, आपल्यातल्या अनेक जणी थोडे थोडे पैसे बाजूला टाकून सोन्यात गुंतवणूक करतात. पण, सोन्यातली गुंतवणूक नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे यावर त्याचा परतावा किती मिळणार, कधी मिळणार आणि कोणत्या स्वरूपात मिळणार हे अवलंबून असतं. मुलींना, तरुणींना, महिलांना सोन्याची विशेष आवड असते असं म्हटलं जातं.
सोन्याचे दागिने आपल्या आवडीनुसार जरूर घ्यावेत; पण उपभोगाखातर, हौसेखातर! गुंतवणूक सल्लागार मात्र असं स्पष्टपणे सांगतात की, सोन्याचे दागिने खरेदी करून त्या माध्यमातून आपण ‘आर्थिक गुंतवणूक’ करत आहोत, असं कुणी मानलं तर ते काही तितकंसं खरं नाही. गुंतवणुकीचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवं ते म्हणजे जास्तीत जास्त परतावा मिळवणं.
त्यामुळे सोन्याकडे जर गुंतवणूक (investment) म्हणून बघायचं असेल आणि प्रत्यक्ष खरेदी करायची असेल, तर प्रमाणित शुद्ध सोन्याची नाणी किंवा बिस्किटं विकत घ्या, असा सल्ला तज्ज्ञमंडळी आवर्जून देतात. याखेरीज गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडच्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येते. यात युनिट रूपाने मिळालेलं सोनं शेअरसारखं विकून त्यातून नफा कमावता येतो. सोव्हेरन गोल्ड बॉण्ड हाही सोन्यातल्या गुंतवणुकीतला एक लाभदायक प्रकार आहे.
हे बॉण्ड केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँक बाजारात आणत असल्याने अधिक सुरक्षित समजले जातात. त्यामुळे इतके दिवस भविष्यकाळासाठीची गुंतवणूक म्हणून फक्त दागिने विकत घेत असाल, तर यापुढे वरील पर्यायांचाही आपल्याला विचार करायचाय हे नक्की मनाशी पक्का करा.