सुप्रिया सुळे बारामती मंतदारसंघाच्या खासदार; शरद पवारांचे वर्चस्व कायम
बारामती लोकसभा मतदारसंघावर ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचेच वर्चस्व कायम आहे, हे सुप्रिया सुळे यांच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पाठीशी असलेली प्रचंड महाशक्ती भाजप, शिवसेना आणि त्यांच्या गटाचे प्रचंड मोठे कार्यकर्त्यांचे जाळे, ताकद या सगळ्यांना छेद देत शरद पवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून बारामतीतून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना अखेर विजयी केले आहे. शरद पवार यांची कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील या बारामतीच्या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले होते. त्यामध्ये शरद पवार यांची सरशी झालेली आहे.
अजित पवारांना मोठा धक्का!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अतिशय दुर्बळ झालेली संघटना आणि अजित पवारांसारखा घरातलाच तगडा विरोधक समोर असतानाही शरद पवारांनी ज्या पद्धतीने आपले डावपेच रचले, व्यूहरचना केली त्याचा परिणाम म्हणजे हा विजय आहे. विधानसभेच्या खडकवासला वगळता इतर पाचही मतदारसंघांत सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली आहे. बारामती या विधानसभा मतदारसंघात सुळे यांनी आघाडी घेऊन अजित पवार यांना प्रचंड मोठा धक्का दिला आहे.
विजय खेचून आणला
महायुतीचे चार आमदार आणि सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे जवळपास सर्व माजी अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिकांचे जवळपास सर्व सदस्य, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, भाजपने दिलेली मोठी ताकद, शिंदे शिवसेनेची भरीव मदत अशी सर्व ताकद अजित पवारांच्या पाठीशी घट्टपणे उभी असतानाही चमत्कार म्हणावा लागेल, अशा पद्धतीने शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचा विजय खेचून आणलेला आहे. शरद पवारांच्यावर बारामती मतदारसंघातील लोकांचे असलेले प्रेम, त्यांच्याबद्दलची प्रचंड सहानुभूती, आदर या बाबींचाही या विजयामध्ये मोठा वाटा आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानभुतीची लाट होती, हे या निकालाने दिसून आले आहे.
इतके सारे असूनही…
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व तुल्यबळ, मते खेचणारे विधानसभेचे मुख्य दावेदार असे नेते अजित पवार यांच्याबरोबर होते. भाजपचे आमदार राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, शिंदे शिवसेनेचे विजय शिवतारे, कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, रमेश थोरात, दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, प्रदीप गारटकर, रूपाली चाकणकर अशी विधानसभेचा एक एक मतदारसंघ कवेत घेण्याची ताकद असलेली आणि याच जोरावर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या तालेवार नेत्यांची ताकद अजित पवार यांच्या पाठीशी असताना खडकवासला वगळता कोणत्याच मतदारसंघात सुनेत्रा पवार आघाडी घेऊ शकल्या नाहीत.