आईने घेतला टोकाचा निर्णय

घरगुती वादातून चार लेकरांसह एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी (ता.३०) रात्री घुंगर्डे हादगाव (ता. अंबड)येथे घडली. गोंदी पोलिस ठाण्यात (Jalna) या प्रकरणाची नोंद घेण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. घुंगर्डे हादगाव येथील अत्यल्प भूधारक शेतकरी ज्ञानेश्‍वर प्रल्हाद अडाणी व गंगासागर हे दांपत्य आपल्या चार मुलांसह राहात होते. ज्ञानेश्‍वरला दारूचे व्यसन असल्याने त्याचे पत्नी गंगासागर बरोबर नेहमीच वाद होत असत. नेहमीप्रमाणे गुरूवारी ही या दोघा पती-पत्नीत वाद झाला. रोजच्याच भांडणाला कंटाळलेल्या गंगासागरने आत्महत्या करण्याचे ठरवून गुरूवारी दुपारी आपल्या चार लेकरांसह घुंगर्डे हदगाव (Ambad) शिवारातील शेत गाठले. दिवसभर शेतात राहून संध्याकाळी सातच्या दरम्यान शेताच्या शेजारी असलेल्या विहिरीत चारही लेकरांसह उडी घेऊन आत्महत्या केली. (Mother Along With Children Committed Suicide In Jalna)दरम्यान शेतात गेलेली पत्नी व मुले घरी न परतल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला होता. परंतु ती कुठेही सापडत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नातेवाईक शोध घेत शेताशेजारील विहिरीजवळ आले असता त्यांना पाचही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. यात गंगासागर अडाणी (वय ३१) ईश्‍वरी अडाणी (वय १३), भक्‍ती (वय ११), अक्षरा (वय ९) व युवराज (वय ७) या पाच जणांचा समावेश होता.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहायक फौजदार एल. व्ही. चौधरी, एस. पी. कुटे यांनी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळीच गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बीरादार, डॉ. पायल राऊत चालक अन्वर पटेल, परिचारक भास्कर पाष्टे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. गोंदी पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पती ज्ञानेश्‍वर अडाणी याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. गंगासागर हिच्या आईसह नातेवाइकांनी एकच टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *