इचलकरंजी येथील गुंडाचा मिरज येथे खून
दोनशे रुपयांच्या वादातून येथील प्रताप कॉलनीत इचलकरंजी येथील गुंड योगेश हणमंत शिंदे (वय 28, मूळ गणेशनगर, इचलकरंजी, सध्या रा. मिरज) याचा दोघांनी खून केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी काही तासांतच सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) आणि प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
योगेश शिंदे हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर त्या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असून तो कळंबा कारागृहात होता. कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरारी झाला होता. त्यानंतर तो मिरजेत प्रताप कॉलनीमधील एका खोलीत पत्नीसह राहत होता. दरम्यान, एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता.
रेल्वेत भेळ विकणारा सलीम सय्यद आणि गोळ्या, शेंगदाणे विकणारा प्रकाश पवार हे दोघे योगेश याच्या शेजारी राहत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्याची ओळख झाली होती. या ओळखीतून तो हॉटेलमधील काम झाल्यानंतर प्रकाश याला रेल्वेत गोळ्या, शेंगदाणे विक्री करण्यासाठी पॅकिंगचे काम करून देत होता. योगेश हा अनेक वेळा त्यांच्यासोबत रेल्वेत गोळ्या, शेंगदाणे विक्रीसाठी देखील जात होता.
तिघे मित्र असल्याने दररोज ते दारू पिण्यासाठी एकत्र बसत. गोळ्या पॅकिंग करण्याच्या व्यवहारात तिघांमध्ये काही वेळा वादावादीच्या घटना घडल्या होत्या. यातून एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. सोमवारी रात्री देखील तिघांनी एकत्र बसून दारू प्याली. त्यानंतर ते प्रताप कॉलनी येथील घरी परतले.
योगेश हा राहत असलेल्या घराच्या कट्ट्यावर बसला होता. त्यांच्यात गोळ्या पॅकिंगच्या व्यवहारात शिल्लक राहिलेल्या दोनशे रुपयांवरून पुन्हा वादावादी झाली. वादावादीचे पर्यावसन मारामारीत झाले. त्यामुळे दोघांनी सोबत आणलेल्या सळीने योगेश याच्या गळ्यावर मारहाण केली. अचानक हल्ला झाल्याने योगेश जमिनीवर कोसळला. योगेश याचा आरडाओरडा ऐकून त्याची पत्नी संगीता घराबाहेर आली. त्यानंतर दोघांनी सळीने योगेश याचा गळा दाबला. त्यामुळे गुदमरुन योगेश याचा जागीच मृत्यू झाला. योगेश याचा आरडाओरडा ऐकून त्याची पत्नी संगीता घराबाहेर आली. योगेश याला जमिनीवर कोसळल्याचे पाहून संगीता यांनी आरडाओरडा करताच दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. संशयितांची माहिती मिळताच तत्काळ पथके रवाना करून दोघांना मिरजेतूनच काही तासात अटक करण्यात आली. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.