शिरोळ परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण
(local news) शिरोळ आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसांत घरफोडी व भुरट्या चोरींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका आठवड्यात धरणगुत्ती, संभाजीपूर, शिरोळ कारखाना परिसर व बिरोबाचे माळ अशा ठिकाणी चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. वारंवार होणार्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा छडा लावण्याबरोबरच गस्त घालण्याच्या प्रमाणात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
शिरोळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गेल्या पाच वर्षांत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना गजाआड केले. पोलिस ठाण्याच्या या कामगिरीची जिल्हा पोलिस प्रशासनाने दखल घेऊन अनेकवेळा सन्मान केला. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची गुन्हेगारांवरील पकड सैल झाली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे. पंधरा दिवसांत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडणे ही बाब पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे. (local news)
शिरोळ, धरणगुत्ती, संभाजीपूर या ठिकाणच्या घरफोड्यांबरोबरच बुधवार आणि शनिवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीसह पाकीटमारीच्या घटनेत वाढ झाली आहे. नुकतेच शहरातील एका तरुणाने दिवसाढवळ्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर परिसरातील गावांत चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुलूपबंद घर, बंगल्यांना टार्गेट करीत चोरीचा सपाटा लावला आहे. मागील काही दिवसांत चोरट्यांनी सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.