कवठेगुलंद येथील 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ

शिरोळ (प्रतिनिधी) :

(local news) जमिनी क्षारपड बनल्यामुळे शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बिकट बनली आहे. क्षारपड जमिनीमुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे कसदार जमिनीचे महत्त्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून जमिनी क्षारमुक्त करण्याचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. गणपतराव पाटील यांनी क्षारपडमुक्तीचा हा पॅटर्न तालुक्यात राबवावा आणि शेतकऱ्यांनीही या कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले.

कवठेगुलंद येथील 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ तहसीलदार अनिलकुमार हेळकर, श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शेतकरी सहकारी क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित जाधव मळा, कवठे गुलंदच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, 40- 50 वर्षापासून ज्या जमिनी क्षारपड होत्या अशा जमिनीमध्ये क्षारपड मुक्तीचे काम झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे. आज अत्यंत विचाराने आणि सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्तिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. लहान व मोठ्या शेतकऱ्यांनी विचार करून एकत्रित येऊन एकाच वेळी शेतीची सर्व कामे नियोजनबद्ध रीतीने करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारखाना चालवण्यासाठी अनेक अडचणी येत असून आगामी काळात ऊसतोड मजूर मिळणार नाहीत. त्यामुळे मशीननेच ऊस तोडणी करावी लागणार आहे. कारखान्याच्या वतीने आगामी काळात शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येणार असून सर्वांगाने विचार करून आणि पुढची दृष्टी ठेवून उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने सातत्याने कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहील. क्षारपड मुक्तीच्या कामांमध्ये काम संपेपर्यंत मी तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या दत्त पॅटर्नला केंद्र सरकारचे कॉपीराईट मिळाले आहे. या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आले असून या चळवळीमुळे आता हमरस्ता तयार झाला असल्याचे सांगितले. राजाराम रावण यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक अविनाश कदम यांनी तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार सरपंच प्रमिला जगताप यांनी मानले. (local news)

प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक विश्वनाथ माने, भैय्यासाहेब पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मंडल अधिकारी अमितकुमार पडळकर, माती परीक्षक ए. एस. पाटील, विजयकुमार गाताडे, सुभाष शहापुरे, बापूसो चौगुले, प्रकाश जाधव, कॉन्ट्रॅक्टर सुदर्शन तकडे, सुहास मडिवाळ, नासर पठाण, गजानन चौगुले, टिल्लू देसाई, अश्विनी पाटील, मुस्ताक पटेल, समशुद्दीन पटेल, मल्लाप्पा ऐनापूरे, शिवमूर्ती देशिंगे, अशोक पाटील, रावसाहेब पाटील, अशोक कदम, ऋषिराज शिंदे, अमोल महाडिक, निरंजन जाधव, अनिल कुमे, मनोज केटकाळे, बाबगोंडा पाटील, बाळासो पाटील, रघुनाथ कुमे, सुरेश आंबी, रावसो गडगले, बंडू पाटील, मारुती गावडे, राजू पाटील, राजू मोरे, कुमार भेंडवडे, मोहन राजमाने, सुधीर पाटील, संघाप्पा केटकाळे यास विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर तहसीलदार अनिलकुमार केळकर यांनी शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *