शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद येथे भीतीचे वातावरण
शिरोळ तालुक्यातील औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने (crushed fox) धुमाकूळ घातला आहे. चार दिवसांत पिसाळलेल्या कोल्ह्याने सात शेतकर्यांवर हल्ला करून जखमी केले आहे. जखमींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. दरम्यान, पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे परिसरात शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद परिसरात उसाच्या तोडी सुरू आहेत. चार दिवसांपासून पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत आहे. त्याने आत्तापर्यंत या भागातील 7 शेतकर्यांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली आहे. औरवाड येथील अशोक मंगसुळे व अमर जगताप या शेतकर्यांवर हल्ला करून कोल्ह्याने चावा घेतला आहे. गौरवाड व कवठेगुलंद येथील अन्य पाच शेतकर्यांचाही चावा घेऊन जखमी केले आहे. कोल्ह्याच्या दहशतीमुळे ऊस तोडणी करण्यासाठी मजूरही शेतात जाण्यास तयार नाहीत.
यामुळे शेतकर्यांची ऊस तोडणी खोळंबली असून शेतकर्यांबरोबर मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे (crushed fox) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही काही महिन्यापूर्वी बिबट्यासद़ृश प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना परिसरात घडली होती. यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने येथे धुमाकूळ घातल्यामुळे वन विभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.