पंचगंगा नदीवरील तेरवाड-शिरोळ बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली
कृष्णा -पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा रविवारी दुपारीच पाण्याखाली गेला आहे. तर मध्यरात्रीच्या सुमारास तेरवाड व शिरोळ हे दोन्ही बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत.
जोरदार पावसामुळे नद्या पुन्हा पात्राबाहेर येऊ लागल्या आहेत. तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फूट, 3 इंच झाली आहे. शिरोळ बंधाऱ्याजवळ 33 फूट झाली आहे. तर कृष्णा नदीची राजापूर बंधाऱ्याजवळ 21 फूट,4 इंच पाणी पातळी झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून 44 हजार 333 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कर्नाटक राज्यात सुरू आहे.
पावसाची पुन्हा रिपरिप सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत रात्रीतून 4 फुटाने वाढ झाली आहे. पंचगंगा नदी पात्रा बाहेर आली आहे. तेरवाड स्मशानभूमी जवळ पाणी आले आहे. गवताच्या कुरणातही पाणी शिरले आहे. कुरुंदवाड पालिकेने अनवडी नदी व गोठणपूर परिसरात पाहणी करून बॅरिकेट्स लावले आहेत.