सांगली: ‘पिनॉमिक’चा सांगलीत एक कोटीचा गंडा

एस. एम. ग्लोबल व वेफा या शेअर मार्केटमध्ये काम करणार्‍या तथाकथित कंपन्यांनी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच आता पिनॉमिक या कंपनीनेही सांगली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत राहणारे अशोक बाबूराव तनवाणी (वय 69) यांना या कंपनीने एक कोटीचा गंडा घातला आहे.

तनवाणी यांनी त्यांची फसवणूक झाल्याची लेखी तक्रार जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित-गेडाम यांच्याकडे केली आहे. यामध्ये संचालक विपुल पाटील, पंकज पाटील (दोघे रा. सांगली) व सदानंद जाधव (विद्यानगर, मिरज) या तिघांविरुद्ध तक्रार असल्याचे तनवाणी यांनी म्हटले आहे. गेडाम यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारीत म्हटले आहे की, तनवाणी व्यापारी आहेत. त्यांची सदानंद जाधव यांच्याशी ओळख होती. जाधव याच्या सांगण्यावरून तनवाणी यांनी कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून दहा महिन्यांत दुप्पट परतावा देतो, असे कंपनीने आमिष दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. तनवाणी यांनी रक्कम परत देण्याची मागणी केली, पण ते टाळाटाळ करीत आहेत. पैसे मागितले तर आत्महत्या करू, अशी धमकीही ते देत आहेत. विपुल पाटीलसह तिघांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तनवाणी यांनी मागणी केली आहे. यावर पोलिसप्रमुख गेडाम यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *