श्री दत्त भांडारच्या सभासदांना वस्तूरूपात 10 टक्के लाभांश
शिरोळ /प्रतिनिधी:
(local news) ग्राहक चळवळ टिकवून ठेवणे गरजेचे असताना उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त भांडारने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. दि. 31 मार्च 2022 अखेर संस्थेची उलाढाल रू. 10 कोटी 68 लाखाची झाली आहे. गेल्या 3 वर्षांपासून सभासदांना वस्तूरूपात लाभांश देण्यात येत असून यावर्षीही 10 टक्के प्रमाणे वस्तूरूपात लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री दत्त भांडार अर्थात श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था लि.चे चेअरमन दामोदर सुतार यांनी दिली. श्री दत्त भांडारच्या सभा हॉलमध्ये खेळीमेळीत झालेल्या 40 व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानपंडित गणपतराव पाटील उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक करताना दामोदर सुतार यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ग्राहकोपयोगी विविध उपक्रमांची माहिती दिली आणि संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी नोटीस आणि सभेपुढील विषय पत्रिकेचे वाचन केले. संस्थेच्या श्री दत्त भांडार समोरील खुल्या जागेत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या दत्तनगर शाखेसाठी कमर्शियल इमारत बांधून देण्यासंबंधी विचार करून त्या अनुषंगाने तयार केलेल्या प्लॅन, एस्टिमेटला व त्याप्रमाणे बांधकामास मान्यता देण्यात आली. तसेच संस्थेकडील व्यवसाय वृद्धीसाठी श्री दत्त भांडारा समोरील खुल्या जागेत फुड मॉल (खाऊ गल्ली) उभारणीसाठी तयार केलेले प्लॅन व एस्टीमेटला व त्याप्रमाणे उभारणीसही मंजुरी देण्यात आली. वरील बँकेच्या कमर्शियल इमारत व फूड मॉल उभारणीसाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांचेकडून कर्ज घेण्यासही सभासदांनी एकमताने मान्यता दिली.
उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, भांडारने अद्ययावत आधुनिकीकरण, ग्राहकांना विनम्र व आपुलकीची सेवा, माफक दर व स्पर्धेच्या युगातही विश्वासाहर्ता जपण्याचे काम केले आहे. ग्राहकांना एक लाख रुपयांचा अपघाती विमा योजना देऊन ८० पात्र ग्राहकांना विमा पॉलिसीचे वितरणही केले आहे. तसेच भांडार मधील सर्व कर्मचाऱ्यांना अपघाती विमा योजना, केंद्र शासनाची ईएसआय योजना तसेच महाराष्ट्र शासनाची कामगार कल्याण योजना लागू केली असून प्रोत्साहन म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांना अहवाल सालात 16.66% बोनस दिले आहे. आंबा महोत्सव, विक्रीवर्धक लकी ड्रॉ योजना, तांदूळ महोत्सव, पारंपरिक दुर्मिळ पिक वाणांचे प्रदर्शन, महिला मेळावा अशा माध्यमातून विविध उपक्रम राबवत संस्था प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. (local news)
प्रारंभी दत्त उद्योग समूहाचे संस्थापक स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहवाल सालात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जयसिंगपूर उदगाव बँकेचे चेअरमन महादेव राजमाने, डॉ. राजश्री पाटील, शिवाजी पोळ, तात्यासाहेब कोरे सहकारी शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे सुनील मालप आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार नासर पठाण यांनी मानले. यावेळी सर्व संचालक, दत्त समूहातील विविध संस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते.