‘पीएफआय’ कनेक्शनच्या संशयातून मिरज येथील एकजण ताब्यात अनेकजण रडारवर
(crime news) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयातून मिरजेत पहाटे इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणने (एलसीबी) यांनी धाड टाकून एका 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तब्बल 14 तास त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशभरात मोठी कारवाई करण्यात येत आहे. देशात 13 हून अधिक राज्यांत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकून अनेकांवर कारवाई केली आहे.
‘पीएफआय’ संघटनेशी मिरजेतील एकजण संबंधित असून, तो या संघटनेमध्ये सक्रिय असल्याची माहिती राज्य गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार संबंधित तरुणाची चौकशी करण्याच्या सूचना पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार इंटेलिजन्स ब्युरो आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अधिकार्यांनी मंगळवारी पहाटे 3.30 वाजता संबंधित तरुण राहत असलेल्या मिरजेतील त्याच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आयबी आणि एलसीबीच्या अधिकार्यांनी त्याच्याकडे तब्बल 14 तास कसून चौकशी केली. त्याच्या मोबाईलचीदेखील तपासणी करण्यात आली. परंतु, त्याच्या चौकशीदरम्यान कोणताही आक्षेपार्ह मजकूर त्याच्याकडे मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणने त्याला महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (crime news)
मिरजेतील अनेकजण रडारवर
देशभरात ‘पीएफआय’ संघटनेवर कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर सांगली पोलिसदेखील सतर्क होते. विशेषत: मिरजेतील काही तरुणांच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली होती. संबंधित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ‘पीएफआय’ संघटनेशी संलग्न असणार्या अन्य तरुणांचे धाबे दणाणले आहेत.
संबंधित तरुण धर्मगुरू?
चौकशीसाठी ताब्यात घेतलेला तरुण हा धर्मगुरू असल्याचे सांगण्यात आले. तो समाज प्रबोधनाचे काम करीत असतो. याबरोबरच तो ‘पीएफआय’ संघटनेचादेखील प्रसार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद़ृष्टीनेदेखील त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आहे.