झोपेत असताना बापाने मुलाच्या आणि आईच्या गळ्यावर फिरवला सुरा
बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये साखर झोपेत असताना पतीने पत्नी आणि पोटाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावात ही घटना घडली आहे. पांडुरंग दोडतले असं हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांना फोन करून हत्या केल्याची माहिती दिली.
माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर पांडुरंग दोडतले कुटुंबासह राहतो. आज पहाटे साखर झोपेत असणाऱ्या पत्नी लक्ष्मी आणि मुलगा पिल्या या दोघांची पांडुरंग याने तीक्ष्ण हत्याराने हत्या केली.
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतलेने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले याला अटक केली. या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हत्या का आणि कशामुळे केली, हे अद्याप समोर येऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
दरम्यान , भंडारा जिल्ह्यात चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात वरवंटा घालून पत्नीला ठार मारल्याची घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी इथं समोर आली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली. अर्चना अरविंद रामटेके (40) असं मृत पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पती अरविंद माधव रामटेके (43) याला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.
पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चनासोबत 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमीच वाद होत होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. शनिवारच्या दिवशी पती पत्नीचे भांडण विकोपाला गेले. अरविंदने रागाच्या भरात घराचा दरवाजा बंद केला आणि पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला.