सांगली : चर्चा नरबळीची; प्रत्यक्षात आजाराने मृत्यू
(crime news) आष्टा – बुर्ली रस्त्यावर पंधरा ते वीस दिवसांच्या नवजात बालिकेचा मृतदेह एका शेतात पुरलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा नरबळी असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, रात्री उशिरा चौकशीअंती हा मृतदेह एका उसतोडणी मजुराच्या मुलीचा असल्याचे आणि आजारपणात तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टा – बुर्ली रस्त्यावरील एका शेतामध्ये काहीतरी पुरलेले आहे, अशी माहिती अक्षय कुंभार (रा. सांगलीवाडी) यांनी मंगळवारी (दि. 6) आष्टा पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पद्मा कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, आष्ट्याच्या अप्पर तहसीलदार धनश्री शंकरदास, आष्टा पोलिस निरीक्षक अजित सिद, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी पाहणी केली असता शेतामध्ये काहीतरी पुरून त्याच्यावर काटेरी बाभळीची फांदी व दगड ठेवल्याचे दिसून आले. जवळच दुधाच्या रिकाम्या पिशव्या, एक वाटी, अगरबत्तीचे रिकामे पाकीट, लहान मुलीचे कपडे ठेवले होते. पोलिसांनी नगरपालिकेच्या कर्मचार्यांना बोलवून शेतामध्ये उकरण्यात आले. यावेळी बालिकेचा मृतदेह पुरलेला आढळून आला. त्यामुळे उपस्थितांमधून हा नरबळी असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आष्टा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि चौकशीची चक्रे फिरू लागली. (crime news)
पोलिसांनी ऊसतोड मजुरांच्या गावागावांमधील पालांवर चौकशी सुरू केली. त्यावेळी बीड जिल्ह्यातून उसतोडणी मजुरीसाठी आलेल्या एका दाम्पत्त्याची ही मुलगी असल्याचे समजले. ती जन्मताच आजारी होती. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारामदरम्यान ती मयत 11 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यामुळे या दांपत्त्याने आष्ट्यातील स्मशानभूमी माहीत नसल्याने शेतातच खड्डा काढून तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
पंचरंगी दोरा अन् गोल ताईत…
पोलिसांनी अप्पर तहसीलदार धनश्री शंकरदास यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. नगरपालिका कर्मचार्यांच्या मदतीने पुरलेल्या बालिकेचा मृतदेह उकरुन बाहेर काढला. मृतदेह निळसर पांढर्या रंगाच्या बेडसीटमध्ये गुंडाळलेला होता. बालिकेच्या कमरेला पंचरंगी दोरा व त्याला गोल आकाराचा ताईत बांधलेला आढळून आला. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा असावा, असा संशय व्यक्त होत होता.