उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे शेतकऱ्यांना नव संजीवनी देण्याचे कार्य अतुलनीय

शिरोळ /प्रतिनिधी:

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन (Saline land) क्षारमुक्त करण्याचा प्रकल्प हाती घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना नव संजीवनी देण्याचे सुरू केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे क्षारपडमुक्त जमीन करण्याचे श्रेय कोणीही लाटू नये. केवळ गणपतराव पाटील यांच्यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होत आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पाटील यांनी केले.

रविवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शिरोळमधील क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची सुरुवात जमीन सर्व्हे करण्याच्या माध्यमातून झाली. उद्यानपंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दत्तचे संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिरोळ धरणगुत्ती मार्गावरील सरळी भागातील 300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस माऊली श्री दत्तगुरु क्षारपड जमीन सुधारणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील पुढे म्हणाले, तालुक्यातील सर्वच गावातील शेतजमिनी अति पाण्यामुळे क्षारपड व मीठमोड झाल्या. या जमिनीमध्ये पिके येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालले. वर्षानुवर्षे जमीन नापिक बनत चालल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत गेला. अशा शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढावी याकरिता श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतरावदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन क्षारपड जमीन (Saline land) सुपीक करण्याच्या प्रकल्पाची माहिती घेऊन हा प्रकल्प तालुक्यात राबवून हजारो हेक्टर जमिनी सुपीक बनवल्या. या जमिनीत अनेक पिके शेतकरी घेऊन आपली आर्थिक सुबत्ता साधत आहेत. पाटील यांनी सुरू केलेल्या या सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली या क्षारपड मुक्त जमीन प्रकल्पाचा आदर्श संपूर्ण देशाने घेतला आहे.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे गणपतराव पाटील म्हणाले, श्री दत्त कारखाना व जयसिंगपूर उदगाव बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण न आणता अर्थसहाय्य करून क्षारपड जमिनी सुपीक करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला. प्रथमत: शिरोळ येथे हा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. पहिल्या टप्प्यात शेडशाळ येथे हा प्रकल्प साकारला. तेथील शेतकऱ्यांनाही जमिनीचे महत्व पटवून द्यावे लागले. सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सहकार्याने केलेल्या क्षारपडमुक्त जमिनीत अनेक पीके घेत आहेत. तालुक्यात तीस हजार एकर जमीन क्षारपड झाली आहे. त्यापैकी 7000 एकर जमीन क्षारपड मुक्त करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. क्षारपड मुक्त जमीन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून एकरी 24 हजार रुपये अनुदानही मिळवून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सुपीक करण्याकरता सामूहिकरित्या प्रयत्न करण्यासाठी एकत्र येऊन हा प्रकल्प राबवण्याची गरज आहे. त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील.

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनीही आपल्या मनोगतामधून दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत क्षारपडमुक्त जमीन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जमिनीचे पूजन करून व श्रीफळ वाढवून क्षारपड मुक्त जमीन प्रकल्पाच्या जमीन सर्व्हे कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास नगरसेवक राजेंद्र माने, पंडीत काळे, प्रकाश गावडे, राजाराम कोळी, माजी सरपंच गजानन संकपाळ, धनाजी पाटील नरदेकर, विजय आरगे, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, दिलीप माने, दरगु पाटील, काशिनाथ भोसले, अमर शिंदे, बाळासो कोळी, उदय संकपाळ, दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, संजय चव्हाण, यशवंत उर्फ बंटी देसाई, गुरुदत्त देसाई, संभाजी सावंत, अरुण माळी, राजाराम कोळी, सुभाष आरगे, सत्याप्पा आरगे, अनिल पाटील, अरवींद खडके, बाळासो पाटील, विजय पाटील, रविंद्र पाटील, देवाप्पा खडके, सुरेश खडके, बाळासो कोरे, कृष्णात माने, आण्णासो काळे, संभाजी संकपाळ, शिवाजी नारंगीकर , श्रीपती माने, आनंदराव कोळी, शक्तीजीत गुरव, गजानन कोळी, बाबासो पुंदे यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *