नांदणीत 28 ला जानेवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या आजवरच्या वाटचालीतील सोनेरी पाऊल म्हणजेच नूतन अद्ययावत प्रकल्पाचा उद्घाटन (Opening) सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 28 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता नांदणी (ता.शिरोळ) येथील स्वाभिमानी फूड क्लस्टरमध्ये होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे मलाजाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळातदेखील प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांवर मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड पार्कमधील तेरा एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल, असा विश्वासहीत्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजय पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आ. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजू आवळे, राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर व एच. के. बत्रा यांसह आजी-माजी खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीचा स्टाफ, कामगार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतील सर्व वितरक, रिटेलर्स उपस्थित राहणार आहेत.

सोहळ्याची (Opening) तयारी अंतिम टप्प्यात असून, पंधरा हजार लोकांची सोय केली जात आहे. या सर्वांसाठी भव्य शामियाना व सर्व सुविधांसह भव्य बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *