केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचे हस्ते श्री दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन
शिरोळ /प्रतिनिधी:
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना आणि श्री दत्त उद्योग समूहाला भेट दिली. त्यांच्या हस्ते श्री दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन (Opening) तसेच श्री दत्त भांडार येथे तांदूळ महोत्सव, सियान ऍग्रोच्या उत्पादनांचा विक्री शुभारंभ आणि शेडशाळ येथील महिलांनी सुरु केलेल्या देशी वाण बीज बँकेचे उद्घाटन करण्यात आले.
कारखाना कार्यस्थळावरील हेलिपॅडवर दुपारी १ वाजता त्यांचे आगमन झाले. यावेळी कारखान्याच्या वतीने चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, व्हॉइस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे यांनी स्वागत केले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त भांडारला भेट देऊन तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन केले. सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नागपूर यांच्या उत्पादनांचा विक्री शुभारंभ केला. तसेच शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फौंडेशन देशी वाण बीज बँकेचे उदघाटनही केले.
सियान अॅग्रो इंडस्ट्रीज & इन्फ्रास्ट्रक्चर लि., नागपूर ही कंपनी गेल्या एक दशकापासून साखरेपासून निर्मित पर्यावरणपूरक अशा शुगर सरफेक्टंटवर संशोधन करीत आहे. आजचा जगाचा पर्यावरणपूरक उत्पादनाकडील कल आणि देशातील साखरेचे वाढते उत्पादन बघता साखरेतील स्वच्छतेसाठी असलेल्या रासायनिक गुणधर्मावर संशोधन करून सियान कंपनीने शुगर सरफेक्टंटची निर्मिती केली आहे. यापासून दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या डिटर्जंट पावडर, डिश वॉश लिक्विड, साबण आणि अन्य स्वच्छतेला पूरक अशी उत्पादने तयार केली आहेत. या उत्पादनांचा विक्री शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
त्याच पद्धतीने तांदूळ महोत्सवाचे उद्घाटनही (Opening) मान्यवरांच्या हस्ते झाले. या महोत्सवामध्ये घनसाळ, रत्नागिरी 24, इंद्रायणी, भोगावती, जया, सोनम, आंबेमोहर, दोडगा, काळा जिरगा, बासमती, हातसडी, जोंधळा जिरगा, सोना मसुरी, कंडा अशा 125 पेक्षा अधिक तांदळाचे प्रकार, त्याचबरोबर शाळू, गहू आणि डाळी यांचाही समावेश करण्यात आला आहे. याचवेळी शेडशाळ येथील महिलांनी गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेचे उद्घाटनही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दत्त उद्योग समूहामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन मान्यवरांनी कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी श्री दत्त भांडारच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खा. संजयकाका पाटील, खा. धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक- निंबाळकर, मयूरचे संजयदादा पाटील तसेच कारखाना संचालक अनिलकुमार यादव, बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, ऍड. प्रमोद पाटील, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, निजामसो पाटील, अमर यादव, संचालिका विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगिता पाटील-कोथळीकर, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, प्रदिप बनगे, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, दरगू माने-गावडे, रावसाहेब नाईक, प्रा. मोहन पाटील यांचेसह सर्व खाते प्रमुख तसेच भांडारचे सर्व संचालक, जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे, परचेस मॅनेजर सुहास मडिवाळ यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.