शिरोळ येथे १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण; साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार
शिरोळ/प्रतिनिधी:
येथील शब्दगंध साहित्य परिषदच्या वतीने दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृति साहित्य संमेलन बुधवार दिनांक एक फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले असून संमेलनाची (Literary conference) जय्यत तयारी करण्यात आली आहे. दत्त साखर कारखाना कार्यस्थळावरील कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या हॉल नजिक भव्य मंडप व मंच उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य परिषदेचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
संमेलनाध्यक्षपद ख्यातनाम हास्यकवी अशोक नायगावकर हे भूषविणार आहेत. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्राचे उच्च व तात्रिक शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार असून माजी मंत्री सदाभाऊ खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शब्दगंधचे अध्यक्ष पृथ्वीराज यादव व उपाध्यक्ष दगडू माने यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
या साहित्य संमेलनात (Literary conference) ख्यातनाम कथाकथनकार जयवंत आवटे यांचे बहारदार कथाकथन होणार आहे. कवी दयासागर बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे रंगतदार काव्यवाचन होणार आहे. तसेच मिरजेचे कवी नाना हलवाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कवींचा कवीकट्टा रंगणार आहे. साहित्य संमेलनात यावर्षीचा कै. भाई दिनकर रावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, हेरवाड येथील राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू कुमारी निकिता कमलाकर हिला प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ कवी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू यांना भाई दिनकररावजी यादव जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात डॉ. रोहित परीट हेरवाड यांच्या अंतिम सत्य या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे हे ८वे वर्ष असून कामेरीचे कादंबरीकार व दमसाचे कार्याध्यक्ष दि. बा. पाटील उपस्थित राहणार आहेत.