सांगली : गांजाच्या नशेत केला मित्राचा घात
(crime news) बावची (ता. वाळवा) येथील ओंकार रकटे या तरुणाचा खून गांजाच्या नशेत झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आष्टा येथे क्षुल्लक कारणावरून ओंकारचा मित्रांनीच बळी घेतला. या घटनेने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. कोरोनाच्या काळात मृतदेह जाळण्याचा अनुभव असल्याने ओंकारचा मृतदेह जाळून त्याची हाडे आणि राख नदीत फेकली. पुरावा नष्ट करण्यासाठी मित्रांनी केलेला हा प्रकार पोलिस यंत्रणेने अखेर उजेडात आणला.
आई, वडिलांचे छत्र हरपले!
ओंकार उर्फ छोट्या भानुदास रकटे (वय 23)…जेमतेम शिक्षण झालेला तरुण. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. एक भाऊ…तोही मतिमंद…आई, वडिलांच्या निधनानंतर चुलत्याने या दोघांचा सांभाळ सुरू केला. चुलत्याचा दूध संकलनाचा व्यवसाय. ओंकारने चुलत्याचा टेम्पो चोरला. त्याला पोलिसांनी अटक केली. कारागृहात गेल्यानंतर त्याची संशयित सम्मेद सावळवाडे, भरत काटकर, राकेश हालुंडे यांच्याशी ओळख झाली.
जामिनावर सुटताच गुन्हेगारी
कारागृहातून हे चौघेही बाहेर आले. तेथून त्यांनी चोरी, मारामारी असे गुन्हे एकत्रित सुरू केले. ओंकारवर इचलकरंजी, विटा व आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्याचे मित्र सम्मेद, भरत यांच्यावर गुन्हे दाखल झाले. काटकरवर खुनाचाही गुन्हा दाखल झाला. चौघेही व्यसनाच्या आहारी गेले. दारू, गांजा याचे सेवन केल्याशिवाय त्यांचे हातच चालत नव्हते. ओंकारला चुलत्याने अनेकदा समजावून सांगितले. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला चुलत्याने घरातून बाहेर काढले.
भाड्याने खोली घेतली
यानंतर ओंकार आष्ट्यात भाड्याने खोली घेऊन राहू लागला. सम्मेद, भरत, राकेश यांच्याशी त्याचा दररोज संपर्क होऊ लागला. एकत्रित बसून ते गांजा व दारूचे सेवन करायचे. काही दिवसापूर्वी सावळवाडे याच्याशी ओंकारचा वाद झाला होता. हा वाद खूपच विकोपाला गेला. हालुंडे व काटकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो मिटला नाही. ओंकारने या दोघांनाही धमकावले. (crime news)
भीती घालणे आले अंगलट
सम्मेद , भरत, राकेश यांनी ओंकारला अद्दल घडविण्याचे ठरविले. त्याला केवळ बेदम चोप देण्याचे त्यांनी नियोजन होते. त्यानुसार त्यांनी त्याला त्याच्या खोलीतून बोलावून घेतले. त्याला मोटारीतून नेऊन बेदम मारहाण केली. तत्पूर्वी या तिघांनी गांजाचे खूप सेवन केले होते. मारहाणीत ओंकार बेशुद्ध पडला. त्याला घरी सोडण्याचे त्यांनी ठरविले. मात्र सम्मेद हा त्याच्यावर खूप चिडून होता. त्याने मोटारीतच ओंकारचा गळा मफलरने आवळला.
मृतदेह जाळला
ओंकार मृत झाल्यानंतर भरत व राकेशला मोठा धक्का बसला. आता करायचे काय, असा ते विचार करू लागल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळायचे ठरविले. आष्ट्यातील स्मशान भूमीतच मृतदेह जाळला. राख शांत होईपर्यंत ते तिथेच बसून राहिले. त्यानंतर त्यांनी राख व हाडे पोत्यात भरून नदीत फेकून दिली. ओंकार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना तातडीने ताब्यात घेतले. त्यावेळीही ते खूप नशेत होते. नशा उतरल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी खून केल्याची कबुली देऊन पोलिसांसमोर थेट लोटांगणच घातले.
लाकडे खरेदीची नोंद, पोलिसांकडे पुरावा
कोरोनाच्या काळात भरत काटकर मृतदेह जाळण्याचे काम करीत होता. लाकडे कशी रचायची, याचा त्याला अनुभव होता. त्यानेच आष्ट्यातून लाकडे खरेदी केली. ती स्मशानभूमीत नेऊन रचली. सम्मेद व राकेश यांनी त्याला मदत केली. जिथून लाकडे खरेदी केली, तिथे त्याची नोंद आहे. पोलिसांनी हा पुरावा जमा करून ठेवला आहे.