बेकायदा सावकारी प्रकरणी वकिलासह सहा जणांवर गुन्हा
लोणी काळभोर परिसरात 7 लाख व्याजाने देऊन त्याबदल्यात तब्बल 18 गुंठे जागाच नावावर करून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरण करून त्यांची जागा नावावर करून घेण्यात आली आहे. पोलिसांकडून वकिलासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्वप्नील राजारा, राजाराम कांचन, अॅड. सुमित वनारसे तसेच प्रशांत गोते व इतर दोघांवर सावकारी कायद्यान्वये लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 30 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा प्रकार 2016 ते 2020 या कालावधीत घडला आहे.
तक्रारदार हे आष्टापूर परिसरातील आहेत. त्यांनी स्वप्नील कांचन 2016 पासून एकूण 7 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी 4 लाख 60 हजार रुपये घेतले होते. त्यानंतरही त्यांनी तक्रारदार यांचे कारमधून अपहरण केले. तसेच, लोणी काळभोरमधील सब रजिस्ट्रार कार्यालयात नेले. त्याठिकाणी त्यांना व कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने व्याजाच्या पैशांपोटी 18 गुंठे जमीन गोते याच्या नावावर केली. तसेच, त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. जागा नावावर करून घेतल्यानंतरदेखील त्यांनी व्याजाचे पैसे आहेत, असे सांगत त्यांना धमकावत तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी त्यांना व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. तर, त्यांना सतत व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावून त्रास दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. त्यानुसार आरोपींच्या राहत्या घराची व कार्यालयाची झडती घेण्यात आली. स्वप्निल राजाराम कांचन याला अटक करून त्याच्या राहत्या घरातून 57 लाख 38 हजार 540 ची रोकड, 48 लाख 62 हजारांचे दागिने असा तब्बल 1 कोटी 6 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. स्वप्निल याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपायुक्त नम—ता पाटील, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक अमित गोरे आणि अंमलदारांनी ही कारवाई केली.