वंचित बहुजन आघाडी कडून अपंगांना निधीचे वाटप करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

शिरोळ/ प्रतिनिधी:

शिरोळ तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीच्या वतीने अपंग कल्याणार्थ योजनेमधून पाच टक्के निधीचे (funding) वाटप अपंगांना करण्याचे आदेश असतानाही गेल्या चार वर्षापासून अपंगांना निधीचे वितरण केलेले नाही. यासंदर्भात प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीपकुमार पाटील यांनी तत्काळ निर्णय घेऊन अपंगांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा व दोषी ग्रामसेवकांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शिरोळ तालुक्यामधील बऱ्याच ग्रामपंचायतींनी अपंग निधी दिला नाही. त्यातील शिरदवाड गावातील ग्रामपंचायतीनेही गेल्या ४ वर्षात अपंग निधी दिला नाही. २-३ वर्षांपासून वांचित बहुजन आघाडी पुरस्कृत शिरोळ तालुका अपंग संघटना यांच्या वतीने निधी मिळावा यासाठी प्रयत्न करत असून, आजतागायत त्यांना निधी दिला नसल्याने निधी (funding) मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीने दि. ३१-०३-२०२३ रोजी पंचायत समिती शिरोळ गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना निवेदन दिले होते. पण आजतागायात निधी दिले नसल्याने वंचित बहुजन आघाडी कडून पंचायत समिती शिरोळ येथे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच चालढकल केल्यास अथवा डोळेझाक केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जिल्हा अध्यक्ष प्रा. विलास कांबळे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. पाटील यांनी या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार, सहसचिव विश्वास फरांडे, प्रसिद्धी प्रमुख संजय सुतार, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे. माजी उपाध्यक्ष प्रकाश टोणपे, प्रसिध्दी प्रमुख विश्वास कांबळे, अपंग दिव्यांग संघटना शिरदवाड अध्यक्ष कुमार आवळे, प्रमोद कांबळे, कुरुंदवाड शहर उपाध्यक्ष अमोल मधाळे, रामचंद्र लोकरे, सदाशिव अडसूळ, संदिप कांबळे, दौलती कांबळे, मीना चौगुले, कल्लापा बरगाले, लक्ष्मीबाई बरगाले, अशोक चौगुले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अपंग बांधव, भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनालाही वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *