सांगली येथील महिलेचा सलगरेत खून
(crime news) येथील अहिल्यानगर-प्रकाशनगरमधील बेपत्ता असलेल्या गौरी जिनपाल गोसावी (वय 35) या महिलेचा सलगरे (ता. मिरज) येथे खून केल्याचे मंगळवारी सायंकाळी उघड झाले. खून करून त्यांचा मृतदेह गायरान जागेत पुरला आहे. नाजूक संबंधातून त्यांचा खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी संशयित म्हणून त्यांचा पुतण्या निहाल सतपाल गोसावी (21) याला ताब्यात घेतले. गौरी या भंगार गोळा करण्याचे काम करतात.
सोमवारी सकाळी सात वाजता त्यांना पतीने माधवनगर (ता. मिरज) येथे सोडले होते. तेथून त्या भंगार गोळा करायला जाते, असे सांगून निघून गेल्या होत्या. दिवसभर त्या घरी परतल्या नाहीत. रात्र झाली तरी त्या घरी आल्या नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे पती जिनपाल यांनी त्या बेपत्ता असल्याची फिर्याद रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांचा तपास सुरू असताना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता संशयित निहाल हा संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने चुलती गौरी यांचा खून करून मृतदेह सलगरे येथे पुरल्याची कबुली दिली.
संजयनगरचे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचे पथक निहालला घेऊन तातडीने सलगरेकडे रवाना झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण तसेच विश्रामबागचे सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले.
‘नाजूक’ संबंधातून गौरी यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना लागली आहे. त्यादृष्टिने पुढील तपासाला ‘दिशा’ देण्यात आली आहे. सध्या तरी निहालच या प्रकरणात मुख्य संशयित आहे. आणखी दोघा-तिघांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करून मध्यरात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निहालने गौरी यांना दुचाकीवरून सलगरेत नेले असण्याची शक्यता आहे. रात्र झाल्यानंतर त्याने खून केल्याची शक्यता आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजयनगर पोलिसांना सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. (crime news)
मृतदेह शोधण्यास तीन तास
गायरान जागेत गौरी यांचा मृतदेह पुरला होता, पण नेमका कुठे पुरला हे त्याला सांगता येईना. ठिकाण शोधण्यात पोलिसांना तीन तास लागले. रात्री नऊ वाजता ठिकाण सापडले. स्थानिक लोकांच्या मदतीने खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला. साधारपणे तीन फूट खड्डा खोदून गौरी यांना पुरले होते. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. निहालने चाकूने वार केल्याची कबुली दिली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यान मृतदेह पुरला.