जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; ‘राजाराम’ दुसर्यांदा पाण्याखाली
जिल्ह्यात सोमवारी पावसाचा (rain) जोर वाढला. शहर, परिसरासह जिल्ह्यात विविध भागांत पावसाची काही काळ संततधार सुरू होती. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दुसर्यांदा पाण्याखाली गेला. यासह पंचगंगेवरील पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या चार झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. रविवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सकाळपासून पावसाच्या दमदार सरी बरसत होत्या. अधूनमधून पाऊस विश्रांती घेत असला, तरी जोरदार कोसळणार्या सरींनी अनेक ठिकाणी पाणी साचत आहे.
रविवारी रात्रीनंतर पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. सकाळी 15.8 फुटांवर असलेली पंचगंगेची पातळी दुपारी दोनच्या सुमारास 16.4 फुटांवर गेली. यामुळे दुपारी तीनच्या सुमारास पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. पोलिसांनी बॅरेकेडिंग लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली. काही काळ पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. रात्री राजारामची पातळी 16.7 फुटांपर्यंत गेली होती.
जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रांत चांगला पाऊस (rain) सुरू आहे. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत चार धरण परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरीत 78 मि.मी., पाटगावात 80 मि.मी., घटप्रभा परिसरात 110 मि.मी., तर कोदे परिसरात 68 मि.मी. पाऊस झाला. पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून, राधानगरी धरणात 4.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दूधगंगा धरणाचा पाणीसाठा 5.41 टीएमसीवर गेला असून, धरण 21 टक्के भरले आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 15.1 मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 35.1 मि.मी. इतका झाला. भुदरगडमध्ये 26.2 मि.मी., तर गगनबावड्यात 24 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 17.5, शाहूवाडीत 15.1, करवीर आणि आजरा तालुक्यांत प्रत्येकी 10.1, गडहिंग्लजमध्ये 7.2, पन्हाळ्यात 7, हातकणंगलेत 2.4, तर सर्वात कमी शिरोळ तालुक्यात 1.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.