शिक्षकांना एक चूक पडू शकते महागात! होणार थेट कारवाई

शाळेत तंबाखू (Tobacco), तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असे करताना आढळल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍कडून कारवाई करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शिक्षक भरती आणि शिक्षक बदल्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने (Education Department) प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयात शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यबंदी, कारवाईबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.

राज्यातील शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी शालेय शिक्षण विभाग तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवले होते. तरीही शाळेत तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य बागळणे, सेवन करण्याबाबतच्या अनेक तक्रारी आहेत.

याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने (Education Department) तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यबंदीच्या कारवाईबाबत निर्णय घेत, कारवाई करण्याचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍ना दिले आहेत.

शाळेत शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यावर सेवेचे आणि वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. वर्तनात कसूर केल्याचे आढळल्यास सुधारणा करण्याबाबत नोटीस दिली जाणार आहे.

सुधारणा न झाल्यास सहा महिन्यांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सुधारणा न झाल्यास ५० टक्के वेतनावर पुन्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत कारवाई करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

मूल्यमापन चाचणी घेणार

शिक्षण सेवक पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सेवेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्याची मूल्यमापन चाचणी घेण्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे.

‘शाळेत आणि शाळेच्या आवारात मद्य तसेच तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्यास किंवा सेवन केल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय स्वागतार्ह आहे.

-सुरेश पाटील, अध्यक्ष, शिरोली शिक्षण प्रसारक मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *