शेडबाळ येथे श्री दत्त साखर कारखाना व महाधनच्या वतीने ऊस पीक परिसंवाद उत्साहात
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेडबाळ येथे ऊस पीक परिसंवाद (seminar) घेण्यात आला. अध्यक्षस्थानी राजू नांद्रे होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जे. पी. पाटील यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची विस्तृतपणे माहिती दिली. रुंद पानाच्या उसाची जात, हंगामाचे नियोजन, सरीची रुंदी, दोन डोळ्यांमधील अंतर यांचे योग्य नियोजन केले तर सूर्याची ऊर्जा उसाला प्राप्त होऊन प्रकाश संश्लेषणाची क्रीया चांगली होत असल्याचे सांगितले. बेणे प्रक्रिया, बेणे निवड, बेसल डोस, सेंद्रिय खताचा वापर, रासायनिक व जैविक पद्धतीने हुमणीचे नियंत्रण, पाण्याचा ताण, पानांची संख्या, आळवणी, फवारणी, उसाच्या जाती, ठिबक सिंचन, जीवामृतचा वापर अशा विविध बाबींचा अभ्यास व वापर करून ऊस उत्पादन वाढीसाठी खत, पाणी, वेळ व श्रमाचे योग्य नियोजन करण्याचा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
(seminar) महाधनचे रविराज वाघमोडे यांनी महाधनने आणलेल्या खत नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. न्यूट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजीमुळे निरोगी आणि सक्षम मुळांची भरघोस वाढ, जमिनीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता व खत वापर कार्यक्षमता वाढत असलेचे सांगितले. त्याच पद्धतीने ऊस विकास आवश्यक अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार निर्माण करण्यात आलेले विशेष खत, प्रत्येक दाण्यांमध्ये सर्व अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध, एनपीके सह दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश अशी महाधनच्या खताची वैशिष्ट्ये सांगून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास निश्चितपणे उत्पादनात वाद होत असल्याची ग्वाही दिली.
दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना विना मोबदला पाणी, पाने व माती परीक्षण कारखान्यामार्फत उपलब्ध असून ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहोत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान वापरून स्वतः रोपे तयार करावीत, आपसात चर्चा करून पाणी, खत व इतर बाबींचे योग्य नियोजन करावे, असे सांगून शेतकऱ्यांची जमीन शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना प्रयत्नशील असून लागेल ती मदत देण्यास कारखाना तयार असल्याचे सांगितले.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन कुमार मालगावे यांनी केले तर आभार ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांनी मानले.
यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील, अमरबाबा यादव, महेंद्र बागे, ज्योतीप्रसाद पाटील, माती परीक्षक ए. एस. पाटील, संजय सुतार, अजित नरसगौडर, सुरगोंडा पाटील, अण्णासो आरवाडे, बाबासो सौंदत्ती, महावीर साबन्नावर, जयकर मगदूम, नेमगोंडा नरसगौडर, विजय कुडचे, भरतेश नांद्रे यांच्यासह शेती अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.