केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस

(crime news) गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षांमध्ये (competitive exams) गैरप्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तलाठी परीक्षेपासून ते राज्य सेवा परीक्षेपर्यंत पेपर रॅकेट कार्यरत असून काही लाखांमध्ये पेपर मिळवून ते सोडवले जात असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशातच आता केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे (Marin Department) घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये बसून विद्यार्थी याची परीक्षा देत असल्याचे समोर आलं आहे.

क्लास वन अधिकारी पदाची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी मुंबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये बसून दिल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (MEO) या क्लास वन अधिकाऱ्याच्या परीक्षेत हा घोटाळा करण्यात आला आहे. या परिक्षेच्या उत्तर पत्रिकेसाठी एका विद्यार्थ्याने तब्बल साडेआठ रुपये भरले होते. त्यानंतर एका नामांकित हॉटेलमध्ये बसून हा विद्यार्थी परीक्षा देत होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने परीक्षा केंद्रातून या उत्तर पत्रिका बाहेर पोहोचवण्यात येत असल्याचे समोर आलं आहे.

मरीन विभागाला याप्रकरणी संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. मर्केंटाईल मरिन विभाग (समुद्र वाणिज्य विभाग) इंजिनीअर ॲण्ड शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल या पदावर कार्यरत असलेले पूर्णाचंद्र विजयकुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार, एमआरए मार्ग पोलिसांनी 22 विद्यार्थ्यांसह 27 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (crime news)

नेमकं काय घडलं?

एका कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने 21 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत एमईओच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेला एकूण 37 विद्यार्थी उपस्थित होते. मात्र कंत्राटी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे या परीक्षेच्या तीन उत्तरपत्रिका सापडल्या. तपास केला असता जानेवारी 2021 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान 22 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात न बसता या उत्तर पत्रिका सोडवल्याचे समोर आले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 22 विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन उत्तरपत्रिका लिहून दिल्या होत्या. यातील एका विद्यार्थ्याने एका नामांकित हॉटेलमधून बसून ही परीक्षा दिली होती. उत्तरपत्रिका बाहेर नेण्यापासून त्या लिहिल्यानंतर आत घेऊन गठ्ठ्यात समाविष्ट करण्यापर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची साखळी काम करत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *