जिल्ह्यात 29 ग्रामपंचायतींत सत्तांतर; ‘इतक्या’ ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मारली बाजी
जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये (Election Results) सर्वच पक्ष आपापल्या वर्चस्वाचे दावे करत आहेत; मात्र गावागावांत सर्व पक्षीय असणाऱ्या स्थानिक आघाड्यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे. ७४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ४२ ठिकाणीमध्ये सत्ताधाऱ्यांनी पुन्हा बाजी मारली.
तीन ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र, तर २९ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या १५ ग्रामपंचायतींमध्येही स्थानिक आघाडीसह संमिश्र सत्ता आली आहे. जिल्ह्यातील (Kolhapur Gram Panchayat) जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ८९ पैकी ७४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. ५) मतदान झाले.
यामध्ये १५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, विजयी झालेल्या आघाड्यांनी आणि उमदेवारांनी गावागावांत जल्लोष करत मिरवणूक काढल्या. त्यात जेसीबीचा वापर करून गुलालाची उधळण करण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण ७४ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक, तर ११ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका झाल्या. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८५.०६ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ८१.३४ टक्के असे एकूण ८४.७८ टक्के मतदान झाले. दरम्यान, काल सकाळी आठपासून ज्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. ज्या-ज्या गावचा निकाल जाहीर होईल, तसा कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरच जल्लोष करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या राजकारणात जे-जे विरोधक आहेत, तेच गावगावांतील निवडणुकांमध्ये एकत्र येऊन स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. दरम्यान, राज्य आणि जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधी आपआपल्या पक्षाचा दावा सांगून जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये आमचीच सत्ता असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत.
तालुका सत्ता कायम सत्तांतर बिनविरोध एकूण (Election Results)
शाहूवाडी ०७ ०३ ०२ १२
करवीर ०६ ०२ ०२ १०
पन्हाळा ०७ ०७ ०१ १५
राधानगरी ०५ ०४ ०३ १२
आजरा ०६ ०३ ०१ १०
भुदरगड ०२ ०२ ०३ ०७
चंदगड ०९ ०७ ०३ २२ (३ संमिश्र)
गडहिंग्लज ०० ०१ ०० ०१
एकूण ४२ २९ १५ ८९