मजूर काम करत असताना बालिंगा उपसा केंद्राचा चेंबर ढासळला

कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणार्‍या बालिंगा उपसा केंद्राच्या दगडी पाट दुरुस्तीचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास आठ मजूर काम करत असताना अचानक चेंबर ढासळला. चेंबरमध्ये सुमारे पन्नास फूट खोल जाऊन दगडी पाटातील पाईपमध्ये काम करणारे आठ मजूर (laborer) केवळ सुदैवाने बचावले.

अशोक भोसले, गजानन कवठेकर, विकास होगले, तानाजी कुंभोजे, प्रदीप तिवडे, अबू बिजली, बलदेव बुधावली, नासिक पठाण आदी कर्मचार्‍यांचा यात समावेश होता. दरम्यान, महापालिकेच्या वतीने चेंबर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 50 फूट लांबीचा पोकलॅन मागविण्यात आला आहे. त्याबरोबरच जेसीबीही आहे. सुमारे 20 पेक्षा जास्त कर्मचारी राबत आहेत.

लाईटची सोय केली असून, रात्रभर काम चालणार आहे. मंगळवारी सकाळपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून, अग्निशमन दलाचे जवानही तळ ठोकून आहेत.

भोगावती नदी ते बालिंगा जॅकवेल हे अंतर सुमारे 750 मीटर लांबीचे आहे. यादरम्यान सुमारे 50 फूट खोल 5 चेंबर आहेत. त्याच्या खाली तीन फूट रुंद आणि चार फूट उंचीचा दगडी पाट आहे. जॅकवेलजवळील चेंबर ढासळल्याने त्याचे दगड दगडी पाटात पडले होते. 2019 व 2021 च्या महापुरात ढासळलेले दगड अद्याप महापालिकने काढलेले नाहीत. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्रातून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात दगड-माती कोसळल्याने पूर्ण दगडी पाट मुजून गेला. परिणामी, नदीतील पाणी जॅकवेलमध्ये येणे बंद झाले.

2 जानेवारीपासून खासगी ठेकेदाराकडून दगडी पाट स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले. 5 नोव्हेंबरपर्यंत काम चालणार होते. परंतु, सुमारे 50 फूट खोल जाऊन काम करावे लागत असल्याने उशीर लागत आहे. सोमवारी सकाळी पुन्हा आठ मजूर दगडी पाटातून पुढे काम करण्यासाठी हळूहळू जात होते. चेंबरच्या बाजूची माती ढासळत आहे. त्यामुळे पर्यायी समांतर पाईप टाकून त्यातून मजुरांना पुढे पाठवण्यात आले होते. चेंबरमध्ये पडलेले दगड, माती काढण्याचे प्रयत्न सुरू होते. काम सुरू असतानाच सुमारे 80 फूट गेल्यानंतर पुढील दगडी पाट कोसळला. जमिनीवर असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनी आरडाओरडा केला. चेंबर ढासळला आहे, बाहेर या…, असे ओरडून सांगितले. यावेळी या चेेंबरपासून अवघ्या पाच फुटांवर मजूर होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे मजूर (laborer) बाहेर आले. त्यानंतर मनुष्यबळाऐवजी जेसीबी, पोकलॅनद्वारे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *