कोल्हापूर : आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांचा मोर्चा
गटप्रवर्तकांचे समायोजन करा, ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने दसरा चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन (movement) केले. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. रास्ता रोकोनंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.
आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असणार्या आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने गेल्या 18 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. पण, त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनाचा भाग म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्या दसरा चौकात जमा झाल्या. तेथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनास (movement) पाठिंबा देण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर त्याच ठिकाणी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या वतीने कॉ. उज्ज्वला पाटील, कॉ. भरमा कांबळे यांची भाषणे झाली. त्यानंतर व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष कॉ. कांबळे, संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवाजी मगदूम, राधिका घाटगे, विमल अतिग्रे, सुरेखा तिसंगीकर, प्रतिभा इंदूलकर, विद्या जाधव यांच्यासह सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या.