कोल्हापूर हादरले! तासाभरात दोन खून

(crime news) सोमवारी रात्री गजबजलेल्या फुलेवाडीतील धाब्याजवळ पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय 30, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा अमानुषपणे खून करण्यात आला. रात्री 8.30 वाजता ही घटना घडली; तर अवघ्या तासात खासबाग मैदानाजवळ काठीने डोक्यात प्रहार करून सतीश बाबुराव खोत (वय 58, रा. बालगोपाल तालमीजवळ) या वृद्धाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला.

दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला

फुलेवाडी आणि खासबाग मैदानाजवळ घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे पोलिस यंत्रणा कमालीची हादरली आहे. दोन्हीही घटनास्थळासह शासकीय रुग्णालयाच्या आवारात कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. ऋषीकेश नलवडे याचे कुटुंबीय तसेच त्याच्या समर्थकांनी आक्रोश केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने पाचारण करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत तणावाची स्थिती होती.

दोन संशयितांची नावे निष्पन्न

फुलेवाडीत सोमवारी रात्री अंधारात आणि निर्जन ठिकाणी पाठलाग करुन झालेल्या ऋषीकेश नलवडे याच्या खुनातील दोन संशयीतांची नावे रात्री उशीरा निष्पन्न झाली आहेत. हा खून पूर्ववैमनस्य आणि गुन्हेगारी टोळ्यातील वर्चस्ववादातून झाल्याचा संशय करवीरचे पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी सांगितले. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

हल्लेखोरांनी केली शरीराची चाळण

दुचाकीवरुन तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ऋषीकेश नलवडे याचा थरारकपणे पाठलाग करुन त्याच्यावर तलवार, कोयता, एडक्याने हातावर, डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर एकापाठोपाठ एक असे सोळा खोलवर वार करुन नलवडे याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली आहे. (crime news)

फुलेवाडी परिसरात अलिकडच्या काळात गुन्हेगारी टोळ्यातील वर्चस्ववादातून जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे याच्या विरोधातही गर्दी, मारामारी आणि हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नलवडे हा फुलेवाडी येथील एका हॉटेलात मद्यप्राशन करुन मित्रासमवेत दुचाकीवरुन जात असताना समोरच्या दिशेने दोन हल्लेखोर दुचाकीवरुन येत असल्याचे दिसून आले.

पाठलाग करून वार

हल्लेखोरांना पाहताच नलवडे याने मित्राच्या दुचाकीवरुन उडी टाकली. संभाव्य हल्ल्याची चाहूल लागताच त्याने मित्राला चौकातील पोरं बोलवून घे असे सांगून त्याने फुलेवाडी येथील भर चौकातील धाब्यालगत असलेल्या रस्त्याने पलायन केले. पाठोपाठ हल्लेखोरांनीही नलवडे याचा पाठलाग सुरू केला. काही क्षणात शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार सुरू केले.

वर्मी हल्ल्यामुळे नलवडे जीवाच्या आकांताने बचावासाठी ओरडू लागला. या आवाजाने परिसरातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले मात्र जमावाच्या डोळ्यादेखत हल्लेखोर त्याच्या शरीराची चाळण करीत होते. हा जीवघेणा हल्ला पाहून बचावासाठी पुढे गेलेला जमाव तेथून पसार झाला.

कोयत्याच्या वाराने हातासह बोटेही तुटली

हल्लेखोरांनी कोयता आणि एडक्याने केलेल्या वर्मी हल्ल्यात ऋषीकेश नलवडे याच्या हातासह बोटेही तुटल्याचे दिसून येत होते. शिवाय पोट, छातीवर आणि पाठीवर खोलवर वार होते. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या नलवडे याला त्याच्या आत्तीसह नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. मुलाचा अमानुषपणे खून झाल्याचे समजताच त्याच्या आई, वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनी आक्रोश केला.

हल्लेखोरांची नावे निष्पन्न

रात्री उशीरा नलवडे याचा खून करणार्‍या दोन्हीही हल्लेखोरांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. पूर्वनियोजीत कट करुनच खूनाचा प्रकार घडला असावा असा संशय पोलिस निरीक्षक कवठेकर यांनी व्यक्त केला. या दोघांशिवाय आणखी काही तरुणांचा खुनाच्या कटात सहभाग असावा असाही संशय त्यांनी व्यक्त केला.

काठीने डोक्यात वर्मी हल्ला करुन टपरी चालकाची हत्या

फुलेवाडीतील खुनाच्या घटनेने शहरात खळबळ माजलेली असतानाच आणि हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची तारांबळ उडालेली असतानाच रात्री साडेनऊच्या सुमारास शिवीगाळ केल्याचा कारणातून काठीने डोक्यात केलेल्या प्रहारामुळे सतीश बाबुराव खोत (वय 58, रा. बालगोपाल तालमीजवळ) याचा मृत्यू झाला. हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शहरातील मध्यवर्ती खासबाग मैदानाजवळ आणि बालगोपाल तालमीच्या पिछाडीस ही घटना घडल्याने मंगळवार पेठ परिसरात खळबळ माजली आहे.

सतीश खोत हा पत्नी व दोन मुलांसह या परिसरात राहतो. पानटपरीचा त्याचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी त्याचा मित्र असलेल्या हल्लेखोराशी दारुच्या नशेत वादावादी झाली. खोत याने हल्लेखोराला शिवीगाळ केल्याने सायंकाळपासून त्यांच्यात वादावादी सुरू होती. खोत रात्री साडेनऊ वाजता बालगोपाल तालमीच्या पिछाडीस झोपलेला असतानाच हल्लेखोराने त्याच्या डोक्यात काठीने जबर प्रहार केला.

डोक्यात एका पाठोपाठ एक झालेल्या हल्ल्यामुळे खोत रक्ताच्या थारोळ्यात निपचीप पडला होता. परिसरातील नागरिकांनी त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र अतिरक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर मंगळवार पेठेतील नागरिकांनी घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *