वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अनोखा जुगाड

विद्युत वितरण कंपनीच्या निफाड उपविभागात शेतीपंपाची वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेतली आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वैयक्तिक शेती पंप विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात सुरू करण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी दिली आहे.

मात्र, वीजपुरवठा खंडित करतेवेळी, एखाद्या डीपीवरील १० ग्राहकांपैकी ६ ग्राहकांनी वीजबिल भरलेली असल्यास उर्वरित 4 ग्राहकांचेही चांगलेच फावते. उर्वरित ४ ग्राहकांनी बिले भरली नसली तरी ज्यांनी वीजबिल भरले आहे अशा ग्राहकांसाठी विद्युत पुरवठा चालू करावा लागतो. अशावेळी नियमितपणे वीजबिल भरणार्‍या ग्राहकांवर अन्याय होतो. हे टाळण्यासाठी निफाड उपविभागातील उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे, गायत्री चव्हाण, आशा निरगुडे, राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य तंत्रज्ञ सुरेश सिताराम चौधरी यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
त्यांनी, प्लास्टिक पाइपला वीळा जोडून पोलवर न चढता, जमिनी वरूनच ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा जुगाड यशस्वी करून दाखवला आहे. अतिशय कमी खर्चात तयार होणा-या या साधनामुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेची व श्रमाची चांगलीच बचत झालेली आहे. शिवाय यामुळे जीवाचा धोका देखील टाळण्यास मदत झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *