वेबसीरीजमध्ये निवड झाल्याचं सांगत हैदराबादला बोलावलं अन्..

(crime news) ठाण्यातील (Thane) खारेगाव परिसरातील रहिवासी असणाऱ्या अभिनेत्रीसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. वेबसीरीजमध्ये निवड झाल्याचं सांगत दोन जणांनी तिची आर्थिक फसवणूक (Money fraud) केली आहे. आरोपींनी पीडितेला फोन करून तुमची वेबसीरीजसाठी निवड झाल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी हैदराबादला यावं लागेल. यानंतर आरोपींनी विमानाची तिकीटं काढण्याच्या नावाखाली अभिनेत्रीची 30 हजाराहून अधिकची आर्थिक फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचं कळताच अभिनेत्रीनं कळवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय फिर्यादी अभिनेत्री ठाण्यातील खारेगाव परिसरातील रहिवासी आहे. यापूर्वी तिने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी आरोपीनं अनिकेत कुमार नावानं फिर्यादीला फोन केला होता. तसेच ई-मेल करून तुमची वेबसीरीजसाठी निवड झाल्याची बतावणी केली होती. संबंधित वेब सीरीजचं चित्रीकरण मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी होणार असल्याचंही त्यानं सांगितलं होतं.

त्यासाठी आवश्यक असणारी काही कागदपत्रं देखील आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे मागवून घेतले होते. तसेच वेबसीरीजबाबत करार करण्यासाठी लवकरच मुंबईतील टेलिफिल्मसच्या कार्यालयात बोलवलं जाईल, असंही सांगितलं. पण त्यानंतर आरोपींनी कोरोनाचं कारण देत करार करण्यासाठी हैदराबादला जावं लागेल अशी बतावणी केली. 1 फेब्रुवारी रोजी शिव नामक आरोपीनं फोन करत आपण कार्यकारी निर्माता बोलत असल्याचं भासवलं. तसेच हैदराबादला येण्यासाठी विमान प्रवासाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. हैदराबादला पोहोचल्यानंतर पैसे परत मिळतील असंही त्यांनी सांगितलं. (crime news)

परंतु, विमानाचं तिकीट प्रोमोकोड वापरून काढल्यावरच तिकिटाचे पैसे मिळतील, असंही या अभिनेत्रीला सांगण्यात आलं. त्यानुसार फिर्यादी अभिनेत्रीने तिचे आणि तिच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीचे अशा दोघांचे प्रोमोकोड वापरून दोन तिकीट आरक्षित केले. पण तिकीट बुकींग होत नसल्यानं तिने याबाबत शिवकडे विचारणा केली. त्याने ऑनलाईन पैसे दिल्यास तुम्हाला तिकीट बुक झाल्याचा ई-मेल येईल, असा दावा केला. बतावणीला बळी पडून फिर्यादी अभिनेत्रीनं आरोपीला 30 हजार 638 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. पण त्यानंतर तिकीटही मिळाले नाहीत आणि आरोपींकडून प्रतिसादही मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अभिनेत्रीनं कळवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *