इचलकरंजी पालिकेत ‘या’ घोटाळ्यामुळे मोठी खळबळ

इचलकरंजी नगरपालिकेच्या चार केंद्र शाळांमधील 18 लाख 70 हजार रुपयांचा टॅब घोटाळा (scam) उघडकीस आला असून, मक्तेदारासह चार केंद्रशाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमुख अशा 9 जणांविरोधात मंगळवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

यामध्ये पुरवठाधारक अनिल गुरव (प्रोप्रा. अनिरुद्ध एज्युकेशन सोल्युशन कोल्हापूर), तत्कालीन मुख्याध्यापक सुरेश सदाशिव विटेकरी, मोहन राजाराम वरणे, सौ. मंगल राजाराम कमाणे, सौ. मंगल बाबुराव माळी यांचा समावेश आहे. याप्रकरणी शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सौ. नम—ता गुरसाळे यांनी फिर्याद दिली आहे.

विद्यमान सभागृहाची मुदत बुधवारी संपत असताना त्याच्या पूर्वसंध्येला उघडकीस आलेल्या या घोटाळ्यामुळे (scam) मोठी खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी पालिकेकडून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणासाठी सन 2018 मध्ये टॅब खरेदी करण्यात आले होते. यामध्ये फसवणूक झाली असून, या टॅब घोटाळाप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक शशांक बावचकर व प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली होती. या प्रकरणाचा अहवाल मागविला असता त्यामध्ये फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासन अधिकारी सौ. गुरसाळे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इचलकरंजी पालिकेच्या जयभवानी विद्या मंदिर क्र. 11, हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर क्र. 22, लालबहादूर शास्त्री विद्या मंदिर क्र. 34 व पंडित जवाहरलाल विद्या मंदिर क्र.36 या चार केंद्र शाळांना प्रत्येकी 50 टॅब देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक शाळेस 4 लाख 67 हजार 500 रुपयांप्रमाणे 18 लाख 70 हजार रुपये केंद्र शाळांकडे वर्गही केले होते. परंतु; प्रत्यक्षात मक्तेदाराने शाळा क्रमांक 22 मध्ये 50 आणि शाळा क्रमांक 11, 34 आणि 36 या तिन्ही केंद्रशाळांना प्रत्येकी 25 टॅब दिल्याचे, परंतु त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर दिलेच नसल्याचे निदर्शनास आले. शिवाय प्रत्यक्षात 125 टॅब पुरविले असताना 200 टॅबचे बिल अदा करण्यात आले आहे.

सॉफ्टवेअर नसल्याने तीन वर्षांपासून टॅब धूळ खात!

सॉफ्टवेअर नसल्याने तीन वर्षापासून टॅब धूळखातच पडले आहेत. तसेच पूर्ण रक्कम पुरवठादाराने घेऊनही उर्वरित टॅब पुरविले नसल्याचे तत्कालीन मुख्याध्यापक विटेकरी, वरणे, कमाणे तसेच विद्यमान मुख्याध्यापिका सौ. माळी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी याबाबत शिक्षण मंडळास कळविलेही नाही किंवा रक्कम परत मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे शासनाची 18 लाख 70 हजारांची फसवणूक होऊन अपहार केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे चारपैकी तीन मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचेे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *