डिग्रजजवळ शिक्षकासह मुलाचे अपहरण, लूट
(crime news) आष्टा येथील शिक्षक शिवाजी यशवंत ढोले ( वय 52, रा. मूळ गाव काकाचीवाडी, बागणी, सध्या रा. सांगली) आणि त्यांचा मुलगा पियुष या दोघांचे बुधवारी रात्री अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाण करून लुटण्यात आले. पन्नास लाख रुपयाची खंडणी देण्याचे कबूल करून घेऊन माणकापूर (इचलकरंजी) जवळ सोडून देण्यात आले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दोन कारमधून आलेल्या आठ ते दहा लोकांनी हे कृत्य केले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दहा अनोळखी संशयितांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ढोले हे काकाचीवाडी येथील सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आष्ट्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
गुरुवारी रात्री ते आणि पियुष हे दोघे एका ढाब्यावर जेवले. त्यानंतर ते आष्टामार्गे सांगलीकडे येत होते. रात्री 10च्या सुमारास कसबे डिग्रज हद्दीत एक पांढर्या रंगाची कार त्यांच्या समोर थांबली. नंबर प्लेटला गुलाल लावलेला होता. त्याचवेळी आणखी एक कार तिथे येऊन थांबली. दोन्ही गाड्यांमधून चेहर्याला रुमाल बांधलेले 10 लोक उतरले. दोघांच्या अंगावर गुलाल टाकू लागले. ढोले यांनी त्यांना “हा कसला गुलाल आहे”, असे विचारले. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करीत “चल तुला कसला गुलाल आहे ते पुढे गेल्यावर सांगतो” असे म्हणत मारहाण करून कारमध्ये बसवले. मुलाच्या गळ्याला सुरा लावून “तू जास्त बोललास तर तुला मारून टाकीन. गप्प गुमान बसा, नाहीतर तुम्हाला खल्लास करतो”, अशी धमकी देत होते.
नंतर दोघांच्या डोळ्यांना रुमाल बांधले. दोन ते अडीच तास प्रवास केल्यानंतर एका निर्जनस्थळी दोघांना नेण्यात आले. तेथे त्यांनी डोळ्यांचे रुमाल सोडले. तिथे दोन खोल्या दिसत होत्या. चार – पाच संशयित दोघांना खोलीत घेऊन गेले. त्यांच्या हातात सुरा, चाकू व चॉपर अशी हत्यारे होती. त्या ठिकाणी ढोले यांच्या गळ्याला चॉपर लावून “तू काय उद्योग करतोस. तू काय काय उद्योग केला आहेस ते मला माहीत आहे, ” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. “जिवंत सोडायचे असेल तर आम्हाला 50 लाख रुपये द्यावे लागतील”, असे म्हणाले. त्यावर ढोले यांनी “आता आम्हाला सोडा. मी तुम्हाला उद्या 25 लाख रुपये आणून देतो”, असे सांगितले. त्यावर एकाने “मी काय किरकोळ आहे काय? मी मोठा डॉन आहे. आम्हाला 50 लाख रुपये पाहिजेत” असे म्हणून ढोले यांना मारहाण केली. त्यावर ढोले यांनी 50 लाख देण्याचे कबूल केले. (crime news)
संशयितांनी चाकू व सुर्याचा धाक दाखवून ढोले यांच्या पॅन्टच्या खिशातील 22 हजार रुपये काढून घेतले. पियुष याच्याकडून 500 रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स असलेले पाकीट काढून घेतले. नंतर दोघांच्या डोळ्यांना पुन्हा पट्टी बांधून त्यांना खोलीतुन बाहेर नेले. त्यानंतर दुचाकीवरून तसेच कारमधून अडीच ते तीन तास फिरवले. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी सुरू होती. “50 लाख रुपये पाहिजेत तरच तुम्हाला जिवंत सोडतो” असे म्हणत होते. संशयितांनी ढोले यांच्या घरी पत्नीस फोन करायला सांगितले. “ मी व्यवस्थित आहे. जोतीबा देव दर्शन करुन दुपारी 12 पर्यंत सांगलीत येतो”, असे जबरदस्तीने सांगायला भाग पाडले. ढोले यांच्या सोसायटीतील लिपिकास फोन फोन करून 1 वाजेपर्यंत 50 लाख रुपये घेऊन येण्याबाबत सांगायला भाग पाडले. त्यानंतर एका तळ्याजवळ कार उभी करून दोघांना उतरवले. “फोन केल्यावर 50 लाख रुपये द्यायचेे” असे सांगून दुचाकी आणि दोघांचे मोबाईल परत दिले.
ढोले यांनी झालेला प्रकार सोसायटीचे लिपीक महाब्री यांना फोनवरूनन सांगितला. हातकणंगले येथे लोकांना घेऊन येण्यास सांगितले. हातकणंगले येथे महाब्री, सरपंच प्रमोद माने आदि गावातील लोक आले. तेथून ते आष्टा पोलिस ठाण्यात गेले. मात्र हा प्रकार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने ते सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात येऊन जबदरस्तीने पळवून नेवून जीवे मारण्याची धमकी देवून 50 लाख रुपयांचे खंडणी मागितल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी गुन्हा दाखल केला आहे.